पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे रुग्णालय तसेच दवाखाने आहेत. तेथे उपचार घेतल्यानंतर बिल कमी करण्यासाठी किंवा संपूर्ण बिल माफ करण्यासाठी नगरसेवक व अन्य लोकप्रतिनिधींच्या कार्यालयातून फोन केले जातात. त्यासाठी दवाब टाकला जातो. त्यामुळे वैद्यकीय अधिकार्यांना नाईलास्तव बिल कमी करावे लागत असल्याने महापालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे.
महापालिकेचे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (वायसीएम) तसेच, नवीन थेरगाव, नवीन भोसरी, नवीन जिजामाता, नवीन तालेरा, आकुर्डी, मासुळकर कॉलनीतील नेत्र रुग्णालय, सांगवी, यमुनानगर हे रुग्णालय आहेत. तसेच, अनेक दवाखाने आहेत. रुग्णालयात शहरातून तसेच, शहराबाहेरील रुग्ण उपचारासाठी येतात. तेथे मात्र माफकदरात उपचार केले जातात.
असे असताना काही नगरसेवकांकडून रुग्णांचे बिल कमी करण्यासाठी संबंधित रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी तसेच, महापालिकेच्या वैद्यकीय अधिकार्यांना फोन करून दबाव टाकला जातो. बिल कमी करा किंवा पूर्णपणे माफ करा, असा आग्रह धरला जातो. त्यासाठी काही नगरसेवक सातत्याने फोन करून पाठपुरावा करतात. तसेच, खासदार व आमदारांच्या कार्यालयांतूनही रुग्णाचे बिल कमी करण्यासाठी वैद्यकीय अधिकार्यांना फोन केले जातात. प्रसंगी मंत्र्यांचे स्वीय सहाय्यकही फोन करून बिल कमी करण्याचे थेट आदेश देतात. लोकप्रतिनिधींच्या वाढत्या दबावामुळे वैद्यकीय अधिकार्यांना नाईलास्तव बिल कमी करावे लागते. असे प्रकार नेहमीच होत असल्याने अगोदरच तोट्यात असलेले महापालिकेचे रुग्णालय आणखी तोट्यात जात आहे. परिणामी, रुग्णालय व दवाखान्यांवर दरवर्षी कोट्यवधीचा मोठ्या प्रमाणात खर्च करणे प्रशासनाला परवडत नसल्याचे खर्च आणि उत्पन्नाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. या प्रकारामुळे अधिकारी वैतागले आहेत.
नगरसेवक, खासदार, आमदारांकडून माफ केलेले बिल वसूल करा
पिंपरी-चिंचवड महापालिकेची आर्थिक स्थिती डबघाईस आली आहे. नवीन कामे करण्यासाठी पुरेसा निधी नाही. असे असताना महापालिकेच्या रुग्णालयातील रुग्णांचे बिल कमी किंवा माफ करण्यासाठी नगरसेवक तसेच, खासदार व आमदार अधिकार्यांना फोन करतात. तो खर्च त्यांच्या नावावर टाकावा. निवडणुकीत वैद्यकीय विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र देताना, ती सर्व रक्कम भरून घ्यावी, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक संदीप वाघेरे यांनी दिला आहे.
रुग्णांची आर्थिक क्षमता घेऊन निर्णय
महापालिका रुग्णालयात खासगी रुग्णालयाच्या तुलनेत माफक दरात तसेच, दर्जेचार उपचार सुविधा दिल्या जातात. शहरातील तसेच, शहराबाहेरील हजारो रुग्ण महापालिका रुग्णालयात उपचार घेत आहेत. उपचार घेतल्यानंतर संबंधित रुग्णांचे बिल माफ करण्यासाठी नगरसेवकांचे फोन येतात. रुग्णांची आर्थिक क्षमता लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार बिल कमी करण्याबाबत विचार केला जातो, असे महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी सांगितले.