EVM Security Pudhari
पिंपरी चिंचवड

PCMC Election EVM Security: पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक; ईव्हीएम मशिन स्ट्राँग रूममध्ये सुरक्षित

१५ जानेवारी २०२६ मतदानासाठी बीड व कोल्हापूर जिल्ह्यांतून ईव्हीएम सुरक्षितरीत्या दाखल

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी ईव्हीएम मशिन, बॅलेट युनिट बीड व कोल्हापूर जिल्ह्यातील संबंधित तालुक्यांतून रविवारी (दि.28) सुरक्षितरीत्या आणण्यात आले आहेत. महापालिकेने चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे स्ट्रॉग रूम तयार केली असून, तेथे कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे.

बीड जिल्ह्यातील गेवराई, पाटोदा व आष्टी तसेच, कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी, आजरा, कागल, भुदरगड, गडहिंग्लज व चंदगड येथील ईव्हीएम मशिनचा समावेश आहे. हे साहित्य चार स्वतंत्र वाहनांच्या ताफ्यामध्ये, पूर्वनियोजित मार्ग व नकाशानुसार चिंचवड येथे आणण्यात आले.

महापालिकेचे मुख्य अभियंता तथा नोडल अधिकारी प्रमोद ओंभासे यांच्यासह कार्यकारी अभियंता तथा सहाय्यक नोडल अधिकारी सुनील पवार, अभिमान भोसले, संतोष कुदळे, राहुल पाटील व इंद्रजीत जाधव यांच्या समन्वयाने हे कामकाज करण्यात आले. त्या ताफ्याला महापालिकेचे 27 कर्मचारी, 12 व्हिडिओ कॅमेरामन व 16 सशस्त्र पोलिस कर्मचारी असा कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या निर्देशानुसार ऑटो क्लस्टर येथे तयार करण्यात आलेल्या सुसज्ज स्ट्राँग रूममध्ये ही सर्व ईव्हीएम मशिन सुरक्षित ठेवण्यात आली आहेत. यावेळी राजकीय पक्षांचे पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते. सर्व वाहनांच्या सीलबंद स्थितीची उपस्थित पोलिस अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या समक्ष खातरजमा करून सील उघडण्यात आली.

त्यानंतर ईव्हीएम मशिन स्ट्राँग रूम अधिकारी संजय काशिद, सत्वशील शितोळे व इतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरक्षितरीत्या उतरविण्यात आली. सध्या सर्व ईव्हीएम यंत्रे निवडणूक आयोगाच्या नियमावलीनुसार सीलबंद स्थितीत सुरक्षित ठेवण्यात आली आहेत. संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक व नियमानुसार पार पाडण्यात आली आहे, असे प्रमोद ओंभासे यांनी सांगितले. यावेळी निवडणूक विभागाचे उपायुक्त सचिन पवार व अधिकारीही उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT