पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपा आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने यादीच प्रसिद्ध केली नाही. त्यामुळे शहरात पक्षाचे कोण कोण उमेदवार आहेत, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. त्यावरून गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
, , , , , , , , ,
निवडणुकीत प्रत्येक पक्षाकडून दोन ते तीन टप्प्यात उमेदवारी यादी प्रसिद्ध केली जात होती. ती यादी वृत्तपत्राकडून प्रसिद्ध केली जात होती. त्यामुळे कोणत्या पक्षाचे उमेदवार समोरासमोर आले आहेत, हे संपूर्ण शहराला तसेच, मतदारांना समजत होते. त्यावरून नागरिकांमध्ये चर्चा होत होती.
मात्र, यंदाच्या निवडणुकीत उमेदवारी यादी प्रसिद्ध करण्याच्या परंपरेला फाटा देण्यात आला आहे. बंडखोरी होऊ नये म्हणून ही दक्षता घेतली जात असल्याने कारण पदाधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी मंगळवार (दि. 30) ही उमेदवारांची यादी भाजपा, शिवसेना (एकनाथ शिंदे), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्ष, काँग्रेस आदी प्रमुख पक्षांकडून प्रसिद्ध करण्यात आली. त्यामुळे उमेदवारांसह समर्थकांसह नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. कोणता उमेदवार कोणत्या पक्षाकडून आहे, हे समजत नसल्याने गोंधळ निर्माण झाला आहे; मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि आम आदमी पार्टीने उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली होती.
या गोंधळात दुसऱ्या दिवशी बुधवार (दि. 31) सर्वच पक्षांकडून उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल, असे अपेक्षित होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस सोडल्यास भाजपा आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) यादी रात्री उशीरापर्यंत प्रसिद्ध नाही. त्यामुळे मतदारांमध्ये गोंधळ कायम आहे. शिस्तबद्ध म्हणवून घेणार्या भाजपाकडून 123 उमेदवारांची यादी प्रसिद्ध न झाल्याने उलटसुलट चर्चा रंगली आहे. तर, शिवसेनेकडून यादी प्रसिद्ध करण्याबाबत रात्री उशिरापर्यंत कोणताही प्रतिसाद देण्यात आला नाही.
भाजपाच्या यादी प्रभाग 24 मधील उमेदवारांची नावे गायब
भाजपाच्या उमेदवारांची यादी बुधवारी (दि.31) रात्री उशिरा प्रसिद्ध करण्यात आली. त्यात थेरगाव, गुजरनगर प्रभाग क्रमांक 24 मधील चारही जागेवरील उमेदवारांची नावे प्रसिद्ध करण्यात आली नाही. त्यामुळे तेथे भाजपाने उमेदवार दिले नाहीत का, उमेदवारांना एबी फॉर्म मुदतीमध्ये दिले नाही का, उमेदवारांचा अर्ज बाद झाला का, असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. या प्रभागात भाजपाकडून माजी नगरसेविका झामाबाई बारणे यांचा मुलगा सिद्धेश्वर बारणे, गणेश गुजर, करिश्मा बारणे, शालिनी शांतिलाल गुजर हे भाजपाचे प्रमुख इच्छुक उमेदवार आहेत. शिस्त प्रिय असलेल्या पक्ष म्हणून ओळख असलेल्या भाजपाकडून एका प्रभागातील एकूण चार उमेदवारांची नावे देता न आल्याने शहरात उलटसुलट चर्चेला उत आला आहे.