Chetan Pawar Pimpri Chinchwad Election 2026: पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापले असताना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवासेना शहरप्रमुख चेतन महादेव पवार यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. पुढारी न्यूज डिजिटलच्या ‘गुलाल महापालिकांचा’ या पॉडकास्टमध्ये बोलताना त्यांनी शहरातील भ्रष्टाचार, रखडलेली विकासकामे आणि नागरिकांच्या मूलभूत समस्यांकडे सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष यावर टीका केली आहे.
चेतन पवार म्हणाले की, राजकारण हा सत्तेचा मार्ग नसून लोकांच्या अडचणी सोडवण्याचं साधन आहे. काही लोकांनी राजकारणाचा गैरवापर केला, पण सामान्य माणसाच्या प्रश्नांसाठी राजकारणात येणं आज अत्यावश्यक आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून पाणी, ड्रेनेज, वीज, रस्ते आणि वाहतूक हेच प्रश्न नेहमी निवडणुकीच्या वेळी असतात. आश्वासनांची खैरात होते, पदे मिळतात; मात्र निवडणूक संपल्यानंतर पुन्हा त्याच समस्या तशाच राहतात, हे शहरातील वास्तव आहे.
भाजपच्या कार्यकाळात शहरात सर्वाधिक भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत पवार म्हणाले की, भाजप केवळ ‘व्हिजन’ दाखवते, पण ते कधीच प्रत्यक्षात उतरवत नाही. शहरीकरण वेगाने वाढत असताना मूलभूत सुविधा मात्र अपुऱ्या आहेत. रस्त्यांची दुरवस्था, वाढते ट्रॅफिक, नियोजनाचा अभाव, या सगळ्याचा फटका थेट नागरिकांना बसतो. विकासाच्या नावाखाली कोट्यवधींची कामे फक्त कागदावर दिसतात; प्रत्यक्षात मात्र भ्रष्टाचारामुळे ती अर्धवटच राहतात, असा आरोप त्यांनी केला.
आगामी महापालिका निवडणुकीबाबत भूमिका स्पष्ट करताना चेतन पवार म्हणाले की, भाजपचा भ्रष्टाचार रोखण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येणं गरजेचं आहे. शहरात शिवसेनेला सन्मानजनक जागा मिळाल्यास महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवली जाईल. अन्यथा शिवसेना आणि मनसे एकत्र येऊन निवडणुकीला सामोरे जातील, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
एकंदरीत, सर्व पक्ष विरुद्ध भाजप, अशीच ही लढाई असेल आणि पिंपरी-चिंचवडला भ्रष्टाचारमुक्त कारभार देण्यासाठी भाजपला रोखणं गरजेचं आहे, असा ठाम विश्वास चेतन पवार यांनी व्यक्त केला.