Chetan Pawar Pimpri-Chinchwad Election Pudhari
पिंपरी चिंचवड

PCMC Election 2026: पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा विकासाचा अजेंडा; चेतन पवार यांनी सांगितला रोडमॅप

Pimpri-Chinchwad Election 2026: युवासेना शहरप्रमुख चेतन महादेव पवार यांनी आपल्या प्रभागासाठीचा विकासाचा आराखडा मांडला आहे. ट्रॅफिक, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा, खेळाची मैदानं आणि कचरा व्यवस्थापन हे त्यांच्या व्हिजनचे मुख्य मुद्दे आहेत.

Rahul Shelke

Chetan Pawar Pimpri-Chinchwad Election 2026: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापलं असताना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवासेना शहरप्रमुख चेतन महादेव पवार यांनी आपल्या प्रभागासाठी विकासाचा आराखडा मांडला आहे. पुढारी न्यूज डिजिटलच्या ‘गुलाल महापालिकांचा’ या पॉडकास्टमध्ये त्यांनी पिंपरी-चिंचवडमधील वास्तव आणि प्रभागाचा विकास कसा करणार, यावर सविस्तर भूमिका मांडली आहे.

चेतन पवार म्हणाले की, ''राजकारणाचा वारसा घरातून मिळाला नसला तरी समाजासाठी काम करण्याची इच्छा आहे. लोकांच्या रोजच्या आयुष्याशी थेट संबंधित असलेल्या प्रश्नांवर काम करणं, हाच आमचा खरा अजेंडा आहे,” असं ते ठामपणे सांगतात.

प्रभागातील मूलभूत सुविधांवर भर

प्रभागात आज सर्वात मोठा प्रश्न म्हणजे वाहतूक कोंडी, खेळाच्या मैदानांची कमतरता आणि आरोग्य सुविधांचा अभाव. या सगळ्यांचा एकत्रित विचार करूनच विकासाचं व्हिजन ठरवलं असल्याचं पवार यांनी सांगितलं.

“इथे ट्रॅफिकचा प्रश्न गंभीर आहे. रोज कामावर जाणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. वाहतूक सुरळीत होण्यासाठी योग्य नियोजन आणि ठोस उपाययोजना करणार आहोत,” असं ते म्हणाले.

यासोबतच, मुलांना खेळण्यासाठी मोकळी जागा मिळावी, यासाठी खेळाची मैदानं आणि जलतरण तलाव उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले. “मुलांना मोबाईलच्या जगातून बाहेर काढायचं असेल, तर त्यांना खेळण्यासाठी सुविधा द्याव्या लागतात,” असं त्यांचं स्पष्ट मत आहे.

आरोग्य सुविधा आणि पाणीपुरवठा देण्यावर भर

प्रभागात सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात उपचार मिळावेत, यासाठी सरकारी रुग्णालय उभारण्याचं व्हिजनही त्यांनी मांडलं.

तसेच पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी भाजपवर टीका करत म्हटलं की, “24 तास पाणी देण्याचं आश्वासन दिलं गेलं, पण प्रत्यक्षात काहीच झालं नाही. जर शिवसेनेवर लोकांनी विश्वास ठेवला, तर नागरिकांना 24 तास पाणी आम्ही देऊ.”

नागरिकांच्या अपेक्षांवर लक्ष

आयटी पार्कजवळचा परिसर असल्यामुळे मोठ्या प्रमाणात नोकरदार वर्ग इथे राहत आहे. “कामासाठी शहरात आलेल्या माणसाची किमान मूलभूत सुविधा तरी मिळाव्यात अशी अपेक्षा असते. पण ट्रॅफिक, कचरा, पाणी अशा प्रश्नांमुळे त्याची निराशा होते. ही निराशा दूर करणं, हाच आमचा उद्देश आहे,” असं चेतन पवार म्हणाले. कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न अद्याप सुटलेला नसल्याचं मान्य करत, तो मार्गी लावण्याचा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

प्रभाग 25 साठी एकजुटीने लढणार

प्रभाग क्रमांक 25 मध्ये शिवसेनेचे संपूर्ण पॅनल विजयी व्हावे, यासाठी सर्व शिवसैनिक एकत्रितपणे काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं. “नेते कोणत्याही पक्षात असोत, पण पिंपरी-चिंचवडमधला शिवसैनिक आजही ठाकरेंसोबत आहे. आपल्या प्रभागाचा नगरसेवक निवडून आणण्यासाठी प्रत्येक शिवसैनिक रस्त्यावर उतरून काम करत आहे,” असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT