पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या रिंगणात 1 हजार 856 उमेदवार आहेत. अर्ज माघारीसाठी शुक्रवार (दि. 2) दुपारी तीनपर्यंतची वेळ आहे. त्यानंतर अंतिम लढतीचे चित्र स्पष्ट होणार असून, सर्वच 32 प्रभागात प्रचाराचा धुरळा उडणार आहे.
महापालिकेच्या 32 प्रभागांत एकूण 128 जागा आहेत. त्यासाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे. मंगळवार (दि.30) पर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आले. बुधवार (दि. 31) झालेल्या छाननीत विविध कारणांमुळे एकूण 99 उमेदवारी अर्ज बाद झाले आहे. रिंगणात शिल्लक राहिलेल्या 1 हजार 894 पैकी 38 जणांनी गुरुवार (दि. 1) माघार घेतली. गुरुवारपर्यंत 1 हजार 856 जणांचे उमेदवारी अर्ज मैदानात आहेत. उमेदवारी अर्ज माघारीच्या उद्याच्या दिवसानंतर प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात किती उमेदवार आहेत, हे स्पष्ट होणार आहे. त्यानंतर प्रमुख उमेदवारांकडून सर्वच 32 प्रभागांत प्रचाराचा धुरळा उडणार आहे. रॅली, पदयात्रा काढून संपूर्ण प्रभाग ढवळून काढला जाणार आहे. त्यामुळे निवडणुकीची खरी रंगत पाहायला मिळणार आहे.
बंडखोरी रोखण्याचे पक्षांसमोर आव्हान
अनेक वर्षे काम करूनही पक्षाने ऐनवेळी तिकीट नाकारल्याने अनेक इच्छुकांनी बंडखोरीचा पवित्रा घेतला आहे. बंडखोरीचा सर्वाधिक फटका भाजपाला बसला आहे. बंडखोर प्रतिस्पर्धी पक्षाकडून तसेच, अपक्ष म्हणून ते रिंगणात उतरले आहेत. त्या बंडखोऱ्यांचे मन वळविण्याचे आव्हान सर्वच पक्षांसमोर आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी शहराध्यक्षांसह इतर पदाधिकाऱ्यांकडून त्यांची मनधरणी करण्यात येत आहे. विविध पदांचे आमिष दाखवले जात आहे. त्यांच्यामागे पदाधिकाऱ्यांनी तगादा लावला आहे. त्यात किती यश मिळते हे शुक्रवारी दुपारी तीनपर्यंत स्पष्ट होणार आहे.
दुपारी तीनपर्यंत अर्ज माघारी घेण्याची वेळ
उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत गुरुवार (दि. 1) आणि शुक्रवार (दि. 2) असे दोन दिवस आहे. शुक्रवारी दुपारी तीनपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. अपक्ष उमेदवारांना चिन्ह वाटप शनिवारी (दि.3) करण्यात येणार आहे. त्याच दिवशी अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
38 जणांनी घेतले आज 41 अर्ज मागे
निवडणुकीसाठी गुरुवार (दि. 1) 38 जणांनी एकूण 41 उमेदवारी अर्ज मागे घेतले. अ क्षेत्रीय कार्यालयात 11 , ब क्षेत्रीय कार्यालयात 2, क क्षेत्रीय कार्यालयात 12, ड क्षेत्रीय कार्यालयात 8, ई क्षेत्रीय कार्यालयात 5, ग क्षेत्रीय कार्यालयात 2 आणि ह क्षेत्रीय कार्यालयात 1 उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आला. फ क्षेत्रीय कार्यालयात एकानेही अर्ज मागे घेतला नाही. उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्यांमध्ये अश्विनी निलेश खंडेराव (10 अ), रोहिणी प्रसाद रासकर (10 ब), गुलामअली भालदार (14 अ), संगीता खेमराज काळे (15 ब), शुभांगी विलास शिंदे (15 ब), स्मिता जयंत बागल (15 ब), संगीता खेमराज काळे (15 क), स्मिता जयंत बागल (15 क), पूजा राजेंद्र सराफ (18 ब), मनीषा चंद्रहास वाल्हेकर (17 क), जुनेद चौधरी (2 क), मोहम्मद खान (2 क), श्रद्धा लांडगे (6 ब), प्रसाद ताठे (6 ब), पंकज पवार (8 अ), राहुल वाघमारे (9 अ), ॲड. दत्ता झुळूक (9 अ), उत्तम कांबळे (9 अ), अजय शेरखाने (9 अ), राजेश नागोसे (9 ड), दीपक म्हेत्रे (9 ड), हनुमंतराव भोसले (9 ड), विनय गायकवाड (25 अ), मोनिका दर्शले (25 ब), राम वाकडकर (25 ड), ममता गायकवाड (26 अ), जयनाथ काटे (28 ड), राजू लोखंडे (29 क), मधूकर रणपिसे (29 ड), किसन जगताप (29 ड ), रजनी भोसले (3 अ ), सचिन लांडगे (5 ड), भरत शिंदे (5 ड), शुंभागी लोंढे (7 अ), प्रज्वल लोंढे (7 अ), कल्याणी (21 क), साक्षी तानाजी बारणे (23 ब) आणि आरती नीलेश आढाव ( 31 अ) यांच्या समावेश आहे.
प्रभाग क्रमांक 20, 30, 31 व 32 मध्ये सर्वाधिक 35 अर्ज बाद
छाननीत एकूण 99 उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. अ क्षेत्रीय कार्यालयातील प्रभाग क्रमांक 10,14,15 व 19 मधील एकूण 12 उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत. क क्षेत्रीय कार्यालयातील प्रभाग क्रमांक 2,6,8 आणि 9 मधील 5 उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत. ड क्षेत्रीय कार्यालयात प्रभाग क्रमांक 25, 26,28 आणि 29 मधील 7 अर्ज बाद झाले आहेत. ई क्षेत्रीय कार्यालयातील 3,4,5 आणि 7 मधील एकूण 6 उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत. फ क्षेत्रीय कार्यालयातील 1, 11, 12 आणि 13 मधील 8 उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत. ग क्षेत्रीय कार्यालयातील प्रभाग क्रमांक 21,23,24 आणि 27 मधील 26 उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत. ह क्षेत्रीय कार्यालयातील प्रभाग क्रमांक 20, 30, 31 आणि 32 मधील सर्वांधिक 35 उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत. तर, ब क्षेत्रीय कार्यालयातील प्रभाग क्रमांक 17, 17, 18 आणि 22 मध्ये एकही अर्ज बाद झाला नाही.