पिंपरी: पिंपरी येथील मिलिटरी डेअरी फार्म आणि पिंपळे सौदागर परिसरातील पवना नदीवर पूर्वी अस्तित्वात असलेला बंधारा पाडण्यात आला आहे. बंधारा पाडल्यापासून परिसरातील भूजल पातळी वेगाने खालावली आहे.
नदीपात्रात केवळ दुर्गंधीयुक्त सांडपाणी वाहत असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच, अस्वच्छता पसरली आहे. त्यामुळे तो बंधारा नव्याने पुन्हा उभारण्याची मागणी होऊ लागली आहे.
काही वर्षांपूर्वी महापालिकेने डासांचा उपद्रवाचे कारण पुढे करत हा बंधारा पाडण्यासाठी डेअरी फार्म प्रशासनाला निधी उपलब्ध करून दिला होता. त्यानंतर हा बंधारा पाडण्यात आला, मात्र तेव्हापासून नदीपात्रात पाणी साठणे बंद झाल्याने या महत्त्वपूर्ण जलस्रोताची अवस्था अत्यंत दयनीय व एका गटारासारखी झाली आहे.
बंधारा उभा असताना पिंपरी गाव, पिंपळे सौदागर, रहाटणी, काळेवाडी, थेरगाव व चिंचवड या संपूर्ण परिसरातील पवना नदी वर्षभर पाण्याने भरलेली असायची. डेअरी फार्ममधील गायी-म्हशींसह परिसरातील जनावरांना या पाण्याचा मोठा आधार होता.
तसेच, भूजलाच्या उच्च पातळीमुळे आजूबाजूच्या गावातील विहिरी व बोअरवेलना वर्षभर पाणी असायचे; परंतु बंधारा नष्ट केल्यापासून भूजल पातळी वेगाने खालावली असून, नदीपात्रात केवळ दुर्गंधीयुक्त सांडपाणी वाहत असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
सध्या काही स्वार्थी बांधकाम व्यावसायिक पूररेषा मर्यादित ठेवण्याच्या कारणावरून या बंधार्याच्या पुनर्बांधणीला अप्रत्यक्ष विरोध करत आहेत. मोजक्या बांधकाम व्यावसायिकांच्या व्यावसायिक फायद्यासाठी व दबावामुळे या महत्त्वाच्या सार्वजनिक कामाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा पर्यावरणप्रेमींनी केला आहे.
दबाव जुगारून बंधारा बांधावा
जनहित व पर्यावरण रक्षणाला प्राधान्य देऊन प्रशासनाने कोणत्याही दबावाखाली न येता पिंपरी डेअरी फार्म व पिंपळे सौदागर येथील पाडलेल्या पवना नदीवर बंधार्याची पुनर्बांधणी करावी; अन्यथा जनआंदोलन छेडले जाईल. यासंदर्भात महापालिका आयुक्तांना पत्र दिले आहे, असे सामाजिक कार्यकर्ते अमोल उबाळे यांनी सांगितले.