पिंपळे गुरव: जुनी सांगवी येथे पवना नदीकाठी मोठ्या प्रमाणावर कचरा जाळला जातो. यामुळे हवा प्रदूषणात वाढ होत आहे. उघड्यावर कचरा जाळणे कायद्याने गुन्हा आहे. परंतु, महापालिकेचा आरोग्य विभाग येथील कचरा उचलत नसल्याने काही नागरिक कचरा पेटवून देत आहेत. यामुळे पर्यावरणाची हानी होत आहे. तसेच आजूबाजूच्या नागरिकांना धुराचा त्रास सहन करावा लागत आहे. या सर्व घटनांकडे संबंधित विभाग डोळेझाक करत असल्याने संपूर्ण परिसर धुराच्या विळख्यात सापडला आहे.
सांगवी परिसरात नदीकाठी टाकलेल्या कचऱ्यासह झुडपे व कोरडे गवत जळत असल्यामुळे प्रचंड धूर निर्माण होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तरीही पिंपरी-चिंचवड महापालिकेचे संबंधित विभाग मात्र डोळेझाक करत असल्याचे गंभीर वास्तव समोर आले आहे. नदीकाठी जमा झालेले प्लॅस्टिक, घरगुती कचरा व इतर ज्वलनशील पदार्थ पेटवल्याने वातावरणात विषारी धूर पसरला आहे.
या धुरामुळे परिसरातील नागरिकांना श्वसनाचे विकार, डोळ्यांची जळजळ, दम्याचा त्रास होण्याची दाट शक्यता असून, लहान मुले, वृद्ध व आजारी नागरिकांना सर्वाधिक धोका संभवतो. विशेष म्हणजे या मार्गावरून दररोज शेकडो वाहनांची ये-जा होते. दाट धुरामुळे वाहनचालकांना अपघाताचा धोका वाढला आहे. त्याचबरोबर नदीकाठालगत असलेल्या सोसायट्या, बैठी घरे व वसाहतीमधील नागरिकांना धुराचा त्रास सहन करावा लागत आहे.
पर्यावरण विभागाचा कानाडोळा
उघड्यावर कचरा जाळणे हा पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार गुन्हा असतानादेखील अशा प्रकारे सर्रास कचरा पेटवला जात आहे. महापालिकेच्या कचरा व्यवस्थापनावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. नदी प्रदूषण, हवा प्रदूषण आणि सार्वजनिक आरोग्याशी खेळ मांडला जात असतानाही प्रशासनाची निष्क्रियता संतापजनक ठरत आहे. या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधितांवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. नदीकाठ स्वच्छ ठेवण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवणे ही आता पिंपरी-चिंचवड महापालिकेची जबाबदारी आहे. अन्यथा नागरिकांच्या आरोग्याशी होणाऱ्या या खेळाची जबाबदारी नेमकी कोण घेणार? असा थेट सवाल संतप्त नागरिकांनी उपस्थित केला आहे.
कचरा जाळल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर धूर पसरतो. त्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व श्वसनविकार असलेल्या रुग्णांना त्रास सहन करावा लागतो. प्रशासनाने कचरा जाळणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी.स्थानिक नागरिक
पवना नदीकाठाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात येईल. भिंतीच्या आतल्या बाजूस कचरा जळत असल्यास तो सहजपणे निदर्शनास येत नाही. संबंधित पथक पाठविण्यात येईल. कचरा जाळल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधित दोषींवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.योगेश आल्हाट, कार्यकारी अभियंता, पर्यावरण विभाग