लोणावळा: जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर लोणावळ्यातील गवळीवाडा येथील मिनु गॅरेज चौकात मोटारसायकल आणि पीएमपीएल बसच्या अपघातात मोटार सायकलवरील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी सकाळी सव्वा सहाच्या सुमारास घडली आहे.
अविनाश दत्तात्रय काळे (वय-30, रा. कस्तुरबा झोपडपट्टी, गणेश खिंड, औंध, पुणे) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी अक्षय दिगंबर काळे (वय-26, रा. वारजे, पुणे ) यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, बसचालक प्रमोद शिवाजी पोळ (वय-35, रा. कराड, सातारा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Pimpri News)
लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अविनाश काळे हा तरुण त्याच्या होंडा शाईन मोटारसायकल वरुन जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गाने पुण्याहून मुंबईला सकाळी कामाला चालला होता.
यादरम्यान तो लोणावळ्यातील गवळीवाडा परिसरातील मिनु गॅरेज चौकातील उतारावर लोणावळ्याहून निगडीला जाणाऱ्या पीएमपीएल बसला जोरात धडकून बसच्या मागील चाकाखाली गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेचा पुढील तपास लोणावळा शहर पोलीस हवालदार देविदास चाकणे करीत आहेत.