मिलिंद कांबळे
पिंपरी : सौर ऊर्जेपासून तसेच, सुक्या कचर्यातून पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे वीजनिर्मिती केली जात आहे. ती वीज महापालिका इमारत, प्रकल्पांना वापरली जात आहे. त्यातून महापालिकेची वर्षाची कोट्यवधी रुपयांची बचत होत आहे. मात्र, दुसरीकडे उड्डाण पूल, इमारती, उद्याने तसेच, मोठ्या संख्येने विद्युत दिव्यांचे खांब उभारून जास्त प्रमाणावर रोषणाई करून विजेची उधळपट्टी केली जात आहे. एकीकडे वीज बचत तर, दुसरीकडे नासाडी या महापालिकेच्या परस्पर विरोधी भूमिकेमुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
महापालिकेने आपल्या सर्व इमारतींवर सौर ऊर्जा पॅनेल बसविले आहेत. त्यातून पहिल्या टप्प्यातील एकूण 72 इमारतींवर बसविण्यात आलेल्या सौर ऊर्जा पॅनेलमधून एकूण 1.47 मेगा व्हॅट वीजनिर्मिती होत आहे. त्यातून वर्षाला तब्बल 20 लाख 10 हजार 960 युनिट मोफत उपलब्ध होत आहे. त्यामुळे महापालिकेची वर्षाला तब्बल 1 कोटी 80 लाख 98 हजार 640 रूपयांची बचत होत आहे. ती वीज त्याच इमारतीसाठी वापरली जात आहे. तर, दुसर्या टप्प्यात नवीन 84 ठिकाणच्या इमारतींवर सौर ऊर्जा पॅनेल बसविण्यात येत आहेत. त्यातून एकूण 3 मेगा वॅट वीज तयार होणार असून, महापालिकेची वर्षाला एकूण 4 कोटी 83 लाख रुपयांची बचत होईल. सौर ऊर्जेतून वीजबिलात मोठी बचत होत आहे.
मात्र, दुसरीकडे महापालिकेडून विजेची उधळपट्टी केली जात असल्याचे दिसून येत आहे. नाशिक फाटा येथील उद्योजक जेआरडी टाटा दुमजली उड्डाणपूल, भोसरीतील राजमाता जिजाऊ उड्डाणपूल, चिंचवड येथील मदर टेरेसा उड्डाणपूल, निगडी येथील भक्ती-शक्ती उड्डाण पूल, ग्रेटसेपरेटर व वर्तुळाकार मार्ग, रावेत येथील संत तुकाराम महाराज पुल (बास्केट ब्रीज) आदी ठिकाणी रंगीबेरंगी दिवे लावून रोषणाई करण्यात आली आहे. पूर्णानगर येथील अटल बिहारी वाजपेयी उद्यान हे केवळ रोषणाईसाठीच खुले केले जाते. पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यानातील कारंजा व मोराची रोषणाईद्वारे सजावट केली आहे. संभाजीनगर येथील बर्ड व्हॅलितील लेसर शोसाठी वीज वापरली जाते. इतरही अनेक उद्यानात मोठ्या प्रमाणात रोषणाई करण्यात आली आहे.
महापालिका भवन व इतर इमारतीवर रंगीबेरंगी दिवे लावून सुशोभीकरण करण्यात आले आहेत. सुशोभीकरणाच्या नावाखाली रस्त्यांवर आवश्यकतेपेक्षा अधिक संख्येने प्रकाश दिव्यांचे खांब बसविण्यात आले आहेत. तसेच, अनेक ठिकाणी झाडांवर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.
मेट्रोने उभारलेल्या पिलरवर रोषणाई केली जाणार आहे. महापालिकेच्या परस्पर विरोधी भूमिकेमुळे शहरवासीयांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पिंपरी-चिंचवड शहराचे वैभव असणारे राजमाता जिजाऊ उद्यान, अटल बिहारी वाजपेयी उद्यान तसेच, निगडी, नाशिक फाटा, भोसरी, मदर टेरेसा, बास्केट ब्रीज हे उड्डाण पुलावर महापालिकेने आकर्षक रोषणाई केली आहे. त्यामुळे शहराचे नावलौकीक वाढत आहे. महापालिका भवनावर वेगवेगळ्या थ्रिमवर रोषणाई केली जाते. त्यावर एलईडी लाईट आहेत. त्या रात्री केवळ दोन ते तीन तास सुरू असतात. त्यामुळे वीजखर्च अल्प होतो. त्याला विजेची नासाडी म्हणता येणार नाही. आकर्षक रोषणाईमुळे महापालिकेचे अनेक ठिकाणचे छायाचित्र व व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. त्यांचे जगभरात कौतुकच झाले आहे. ती शहरासाठी अभिमानास्पद बाब आहे, असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी सांगितले.
72 ठिकाणच्या सौर ऊर्जेतून : 1.47 मेगा वॅट वीजनिर्मिती
बचत : वर्षाला 1 कोटी 80 लाख 98 हजार 640 रु.
84 ठिकाणच्या सौर ऊर्जेतून : 3 मेगा वॅट वीजनिर्मिती
बचत : वर्षाला 4 कोटी 83 लाख रुपये
कचर्यापासून मोशी डेपोत : 14 मेगा वॅट वीजनिर्मिती
बचत : वर्षाला 48 कोटी रुपये