मिलिंद कांबळे
पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीप्रमाणे यंदाची प्रभागरचना करण्यात आली आहे. मागील प्रभागरचनेचा फायदा भाजपला झाला होता. त्याप्रमाणे यंदाच्या निवडणुकीतही सत्ताधारी भाजपला प्रभागरचनेचा फायदा होईल, असा दावा केला जात आहे.
त्यात महायुतीतील अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाला किती वाटा मिळणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. तर, विरोधातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस या पक्षांनी विजयासाठी वज्रमूठ केल्याचे दिसत आहे. (Latest Pimpri News)
राज्यात भाजपची सत्ता असताना फेब्रुवारी 2017 च्या निवडणुकीत पिंपरी-चिंचवड महापालिकेचे चार सदस्यीय एकूण 32 प्रभाग तयार करण्यात आले होते. सोयीस्कर प्रभाग रचना असल्याने महापालिकेवर पहिल्यांदाच भाजपचा झेंडा फडकला होता.
राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता खेचण्यात भाजपला यश आले होते. त्यासाठी भाजपने राष्ट्रवादीसह इतर पक्षाचे सक्षम उमेदवार आपल्यासोबत घेतले होते. तसेच, मोदी लाटेचाही त्यांना फायदा झाला. पराभवामुळे सत्तेतील राष्ट्रवादीला विरोधी बाकावर बसावे लागले.
महायुतीतील भाजप महापालिका सत्ता पुन्हा आपल्याकडे राखण्यासाठी सरसावला आहे. भाजपकडून सर्व 128 जागांवर उमेदवार तयार असल्याचा दावा केला जात आहे. स्थानिक पदाधिकार्यांनी भाजपने स्वबळावर लढण्याची तयारी दर्शविली आहे.
तर, हातातून गेलेली सत्ता ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस गांभीर्याने पावले टाकत असल्याचे दिसून येत आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार सातत्याने बैठका, दौरे तसेच, मेळावे घेऊन पदाधिकार्यांना मार्गदर्शनाचा धडाका लावला आहे. तर, शिवसेना आणि आरपीआयची संपूर्ण मदार भाजपवर अवलंबून आहे.
दुसरीकडे, विरोधातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस व घटक पक्ष एकत्रित येऊन सत्ताधारी भाजपला खाली खेचण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्या दृष्टीने मोर्चेबांधणी केली जात आहे. आघाडीतील आम आदमी पक्षाने स्वतंत्रपणे लढण्याचे आधीच घोषित केले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वतंत्रपणे लढणार की, शिवसेना ठाकरे पक्षासोबत जाणार, त्याबाबत राज ठाकरे यांच्याकडून स्पष्ट न झाल्याने कार्यकर्ते संभ्रमात आहेत.
प्रशासकीय राजवटीमुळे प्रभागात निर्माण झाले अनेक इच्छुक
कोरोना महामारी, ओबीसी आरक्षण, सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहचलेला वाद व इतर कारणांमुळे महापालिकेची निवडणुकीत मुदतीमध्ये झाली नाही. त्यामुळे महापालिकेत 13 मार्च 2022 पासून प्रशासकीय राजवट सुरू आहे. निवडणूक लवकरच होणार, असे सांगितले जात असल्याने माजी नगरसेवक व इच्छुक आपल्या प्रभागात सक्रिय होते. वर्षभर विविध कार्यक्रम घेतले जात होते.
मात्र, निवडणुका पुढे पुढे ढकल्या जात असल्याने अनेक माजी नगरसेवकांनी संपर्क कार्यालये बंद करुन शांत राहणे पसंत केले होते. त्याचा फायदा घेत शहरातील सर्वच प्रभागात अनेक नवे इच्छुक तयार झाले. प्रशासकीय राजवटीच्या साडेतीन वर्षाच्या कालावधीत कार्यकर्त्यांसह इच्छुकांची भर पडली आहे.
त्यांनी प्रभागात जनसंपर्क वाढवून, माजी नगरसेवकांना आव्हान निर्माण केले आहे. त्यामुळे प्रमुख पक्षाकडे विशेषत: सत्तेतील पक्षाकडे इच्छुकांची संख्या वाढली आहे. एका एका प्रभागात उमेदवारीवरून तीव्र स्पर्धा निर्माण झाल्याचे दिसत आहे. तिकीटासाठी वरिष्ठ नेत्यांसह स्थानिक लोकप्रनिधींकडे मोर्चेबांधणी केली जात आहे. इच्छुकांच्या वाढत्या संख्येमुळे कार्ड कमिटीसमोर उमेदवारीबाबत पेच निर्माण होऊ शकतो. तर, काही पक्षाकडे संपूर्ण शहरात 128 उमेदवार शोधण्याची वेळ येणार आहे.
अनेक जण प्रत्यक्ष निवडणूक जाहीर होण्याच्या प्रतीक्षेत
कोणत्या पक्षाकडून लढायचे याबाबत अनेक माजी नगरसेवक व इच्छुक अद्याप संभ्रमात आहेत. महायुतीतील भाजप की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष की पर्याय म्हणून महाविकास आघाडीतील पक्षाच्या उमेदवारीवर स्वार व्हायचे हे प्रत्यक्ष निवडणूक जाहीर झाल्यावर ठरवायचे असा इरादा काठावरील इच्छुकांनी केला आहे. ऐनवेळी बंडखोरी करुन सुरक्षित प्रभागातून निवडून येण्याचे काहींनी डावपेच आखले आहेत. त्यात किती जणांना यश मिळते, कोणाच्या गळ्यात तिकीटासह विजयाची माळ पडते, हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होणार आहे.