पिंपरी : पुढारी वृत्तसेवा
महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) जन्म-मृत्यू नोंदणीसाठी निर्माण झालेला इंटरनेटचा अडथळा दूर झाला आहे. त्याचप्रमाणे, सर्व्हर डाऊनची समस्यादेखील सुटली आहे. गेल्या दोन दिवसांपासून हे कामकाज सुरळीत सुरू झाले आहे.
महापालिकेच्या सर्व विभागांना जोडणारी इंटरनेटची केबल ही रस्त्याचे काम करताना तुटल्याने इंटरनेट सेवा बंद झाली होती. त्याचप्रमाणे, जन्माची नोंदणी सेंट्रलाईज पद्धतीने होण्यासाठी केंद्र सरकारने नुकतेच सीएसआर पोर्टल सुरू केले आहे.
त्यातच सर्व अर्जाची नोंद घेणे अनिवार्य आहे. या पोर्टलमध्येदेखील तांत्रिक अडचणी येत होत्या. त्यामुळे वायसीएम रुग्णालयात १८ ते २३ तारखेदरम्यान जन्म-मृत्यूची नोंद ऑनलाईन पद्धतीने घेण्यामध्ये अडचणी येत होत्या.
त्यामुळे नागरिकांना त्यासाठी वारंवार हेलपाटे मारण्याची वेळ येत होती. दरम्यान, शुक्रवारपासून (दि. २५) इंटरनेट सेवा पूर्ववत सुरू झाली. त्या दिवशी दिवसभरात ४० ते ५० दाखले देण्याचे कामकाज करण्यात आले. तर, शनिवारी (दि. २६) कामकाजाची वेळ कमी असल्याने त्या तुलनेत कमी दाखल्यांचे वितरण झाले.
महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील जन्म-मृत्यू नोंदणीचे ऑनलाईन कामकाज पूर्ववत सुरळीत झाले आहे. इंटरनेट आणि सर्व्हर डाऊनची समस्या सुटली आहे. -डॉ. मनीषा सूर्यवंशी, वैद्यकीय उपअधीक्षक तथा उपनिबंधक, जन्म-मृत्यू नोंदणी विभाग, वायसीएम रुग्णालय.