कुंडमळा येथेव्यूइंग पॉईंट पूल बांधणार : उपमुख्यमंत्री अजित पवार File Photo
पिंपरी चिंचवड

Ajit Pawar: कुंडमळा येथे फक्त पूल नव्हे; पर्यटनदृष्ट्या व्यूइंग पॉईंट पूल बांधणार! उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्पष्टीकरण

नवीन पुलाचे काम पावसाळ्यानंतर लगेच सुरू केले जाईल

पुढारी वृत्तसेवा

वडगाव मावळ : कुंडमळा येथे फक्त पूल नाही, तर पर्यटनदृष्ट्या व्यूइंग पॉईंट पूल बांधला जाईल. त्यासाठी अतिरिक्त निधीही उपलब्ध करून दिला जाईल व नवीन पुलाचे काम पावसाळ्यानंतर लगेच सुरू केले जाईल, असे स्पष्ट करत या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करणार असून, धोकादायक ठरणारे इतर पूलही पाडले जातील, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कुंडमळा येथे भेटीदरम्यान दिले.

रविवारी कुंडमळा येथे पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री पवार यांनी आज भेट देऊन पाहणी केली. या वेळी आमदार सुनील शेळके, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पोलिस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, सार्वजनिक बांधकामचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, अधीक्षक अभियंता बाप्पा बहिर, प्रांताधिकारी सुरेंद्र नवले आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, या ठिकाणी साडेसात मीटर रुंदीचा नवीन पूल उभारण्यात येणार असून, दोन्ही बाजूंना 8 फूट रुंद पदपथ व दोन दर्शक गॅलरी (व्यूइंग पॉईंट) असतील. हा पूल पर्यटनदृष्ट्या उपयोगी ठरणार असून, कामास पावसाळ्यानंतर तातडीने सुरुवात होणार आहे. आवश्यक अतिरिक्त निधीही उपलब्ध करून देण्यात येईल, असेही स्पष्ट केले.

या घटनेची चौकशी करण्यासाठी अपर जिल्हाधिकारी, उपवनसंरक्षक अधिकारी, सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता, पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता आदींसह निवासी उपजिल्हाधिकारी यांची समिती नेमली आहे, या समितीच्या माध्यमातून चौकशी केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. तसेच तातडीने धाव घेऊन बचावकार्य केलेल्या स्थानिक नागरिकांना शाबासकी देत बचावकार्यात विशेष सहभाग असलेल्या पथकांचेही कौतुक केले.

बचावकार्यासाठी विशेष निधी देणार!

मावळ तालुक्यात पर्यटकांची संख्या वाढत आहे. मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. त्यामुळे येथे पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बचाव कार्यासाठी अत्याधुनिक वाहन, आवश्यक साहित्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.

धोकादायक पूल पाडणार !

अपघातग्रस्त पुलाचा उर्वरित सर्व भाग पाडण्याचे निर्देश देऊन आयुष्य संपलेले तसेच स्ट्रक्चरल ऑडिटर्स यांनी वापरण्यास धोकादायक असा शेरा दिलेले इतरही सर्व पूल पाडण्यात येतील, असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT