सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून नऊ गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी त्याच्याकडून सात लाख 74 हजार 860 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाकडून ही कामगिरी करण्यात आली आहे.
आकाश वजीर राठोड (24, रा. मुळशी, जि. पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयात चैन चोरीच्या घटना दाखल होत्या. याबाबत तपास करताना पोलिसांनी सराईत गुन्हेगारांच्या हालचालीवर लक्ष ठेवले. तसेच, गुन्हा घडलेल्या ठिकाणांवरी सीसीटीव्ही फुटेजचीही पाहणी केली. त्या वेळी त्यांना सराईत गुन्हेगार आकाश राठोड याच्याबाबत माहिती मिळाली.
त्यानुसार, पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपल्या इतर तीन साथीदारांच्या मदतीने गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यापैकी दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी अटक केली असून आणखी एका साथीदाराचा शोध सुरू आहे.
ही कामगिरी पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, सहआयुक्त शशिकांत महावरकर, अपर आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त संदीप डोईफोडे, सहायक आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ, सहायक निरीक्षक अभिनय पवार, उपनिरीक्षक भरत गोसावी, पोलिस अंमलदार महेश खांडे, औदुंबर रोंगे, गणेश हिंगे, आशिष बनकर, राहूल खारगे, प्रवीण कांबळे, नितीन लोखंडे, सोमनाथ मोरे, प्रशांत पाटील, पोहवा गडदे, पोना गणेश कोकणे, गणेश सावंत, विनोद वीर, सुमीत देवकर, बाबाराजे मुंडे, समीर रासकक, अमर कदम, हर्षद कदम, अमोल गोरे, मोहसीन आत्तार, मारुती जायभाय यांच्या पथकाने केली आहे.
आरोपीकडून रावेत, निगडी, चिखली व आळंदी परिसरात चेन चोरी व चाकण परिसरात वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. त्याकडून चोरलेले सात लाख 74 हजार 860 रुपयांचे 84 ग्रॅम 980 मिली वजनाचे सोन्याचे दागिने व 3 मोटारसायकल असा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी राठोड यांच्यावर विविध पोलिस ठाण्यांमध्ये तब्बल 21 गुन्ह्यांची नोंद आहे.