Pimpri Ward Election Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Ward Election: निगडी प्रभागात बहुपक्षीय लढत; महापालिका निवडणुकीची रंगत वाढली

भाजप, राष्ट्रवादी, मनसेसह सर्व पक्ष आमनेसामने; बंडखोरीचीही शक्यता

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहराच्या प्रवेशद्वारावर असलेला हा प्रभाग आहे. गेल्या निवडणुकीत भाजपाचे दोन, राष्ट्रवादी काँग््रेास एक आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक असे नगरसेवक निवडून आले होते. यंदाही प्रमुख पक्षातील उमेदवार आमने-सामने असल्याने रंगतदार लढत पाहावयास मिळणार आहे.

भाजपाचे माजी नगरसेवक उत्तम केंदळे व कमल घोलप, राष्ट्रवादीच्या सुमन पवळे आणि मनसेचे शहरातील एकमेव नगरसेसवक तथा शहराध्यक्ष सचिन चिखले या प्रभागाचे नेतृत्व करतात. गेल्या निवडणुकीत माजी नगरसेविका सुलभा उबाळे, अश्विनी चिखले, तानाजी खाडे यांचा पराभव झाला होता. भाजपाकडून उत्तम केंदळे, कमल घोलप, अनिल घोलप, सोमनाथ काळभोर, सचिन काळभोर यांच्यासह अनेक जण इच्छुक आहेत. माजी विरोधी पक्षनेत्या सुलभा उबाळे यांनी शिवसेना ठाकरे पक्षातून शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश केला आहे. मनसेकडून सचिन चिखले व अश्विनी चिखले हे दोघे इच्छुक आहेत. शिवसेना ठाकरे पक्षाकडून सतीश मरळ, सीमा पवार हे इच्छुक आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून ॲड. संतोष शिंदे, शीतल शिंदे हे इच्छुक आहेत. तसेच, शिरीष जेंधे व इतर इच्छुक आहेत. भाजपा व शिवसेना युती संपूर्ण पॅनेलवर कब्जा करण्याच्या प्रयत्नात आहे; मात्र इच्छुकांची संख्या जास्त असल्याने बंडखोरीचा सामना करावा लागणार आहे. तर, राष्ट्रवादी, मनसे व इतर पक्षही आपली ताकद दाखविण्यासाठी सरसावले आहेत.

प्रभागातील परिसर

निगडी गावठाण, सेक्टर क्रमांक 22, ओटा स्किम, यमुनानर, माता अमृतानंदमयी मठ परिसर, श्रीकृष्ण मंदिर परिसर, साईनाथनगर आदी.

भक्ती-शक्ती चौकापासून मेट्रोचे काम सुरू

निगडी येथील भक्ती-शक्ती समूह शिल्प चौकात उड्डाणपूल, रोटरी पूल, ग््रेाडसेपरेटर उभारल्याने चौक सिग्नल फी होऊन वाहतूक सुरक्षित झाली आहे. तेथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे बस टर्मिनल उभारण्यात आले असून, पुतळ्याचे सुशोभिकरण करण्यात आले आहे. भक्ती-शक्ती चौक ते पिंपरी मेट्रो मार्गाचे काम सुरू झाल्याने थेट स्वारगेटपर्यंत मेट्रोने ये-जा करता येणार आहे. निगडीतील महापालिका दवाखान्याचे विस्तारीकरण करण्यात आले आहे. निगडीतील अमरधाम स्मशानभूमी अद्ययावत करण्यात आली आहे. नव्याने जलवाहिनी व ड्रेनेजलाईन टाकण्यात आली आहे. रस्त्यांचे काँक्रीटीकरण तसेच, डांबरीकरण करण्यात आले आहे. यमुनानगर येथील जलतरण तलाव दुरुस्त करून तो खुला करण्यात आला आहे. तरुणांना रोजगार देण्यासाठी निगडी येथे लाईट हाऊस केंद्र केंद्र सुरू करण्यात आले आहे.

प्रभागातील जागांचे आरक्षण

  • अ-एससी

  • ब-ओबीसी महिला

  • क-सर्वसाधारण महिला

  • ड-सर्वसाधारण

रेडझोनमुळे विकासाला बाधा

हाऊसिंग सोसायटी, गावठाण व झोपडपट्टी असा संमिश्र लोकवस्ती असलेला हा प्रभाग आहे. बहुतांश भाग रेडझोन बाधित असल्याने अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. रेडझोनमुळे मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार करता येत नाहीत. मालमत्तेस बाजारमूल्य मिळत नाही. रेड झोनचा नकाशा प्रसिद्ध न केल्याने रहिवाशांमध्ये संभम आहे. सेक्टर क्रमांक 11 मधील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पास स्थगिती मिळाल्याने त्या इमारती गेल्या 15 वर्षांपासून धूळखात पडल्या आहेत. तेथील 920 लाभार्थी घरापासून वंचित आहेत. सेक्टर क्रमांक 22 मध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छता असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक भागांत पाणीटंचाई व वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक हैराण आहेत. वारंवार रस्ते खोदकाम केले जात असल्याने खड्ड्‌‍यामुळे वाहनचालक वैतागले आहेत. निगडी बस थांबा चौक आणि परिसरात वाहतूक कोंडीचा त्रास नित्याचा झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT