NCP Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad NCP Strategy: शहर राष्ट्रवादीचा ‘भाजप पॅटर्न’; एसआयआर मोहिमेसाठी कार्यकर्त्यांची नेमणूक

महापालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा पुन्हा फडकवण्याचे अजितदादाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राष्ट्रवादी सरसावरली आहे.

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: राज्यात महायुतीत असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पिंपरी-चिंचवड महापालिकेवर लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा पुन्हा फडकवण्याचे अजितदादाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राष्ट्रवादी सरसावरली आहे.

त्याच हेतूने भाजपचा निवडणूक पूर्वतयारीचा पॅटर्न राष्ट्रवादीकडून राबवला जात आहे. मतदार पडताळणीसाठी (एसआयआर) पाचशेपेक्षा अधिक कार्यकर्ते नेमण्यात आले असून, त्याबाबतच्या कामकाजाचे दररोज राज्य कमिटीकडून अपडेट घेतले जात आहेत.

मतदार पडताळणी मोहीम राज्यभरात सुरू आहे. ती मोहीम 17 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. त्यासंदर्भात नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने शहरात दोन ठिकाणी मेळावे घेतले. शहरातील प्रभागातील सर्वाधिक मतदारांकडून अर्ज भरून घेण्यासाठी राष्ट्रवादीने बीएलओप्रमाणे कार्यकर्ते व स्वयंसेवक नेमले आहेत.

ते दररोजच्या कामकाजवर लक्ष ठेवत असून, अधिकाधिक मतदारांकडून अर्ज भरून घेण्यासाठी ते प्रयत्न करत आहे. त्यासाठी स्थानिक नगरसेवक, माजी नगरसेवक, पदाधिकारी व सक्रिय कार्यकर्त्यांची मदत घेतली जात आहे. त्यासाठी एका खासगी एजन्सीची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांनी एक मोबाईल अ‍ॅप तयार केले असून, त्यावर दररोजच्या नोंदणीची अपडेट घेतली जात आहे. त्याचा अहवाल राज्य कमिटीला दिला जात आहे.

शहरात पक्षाचे केवळ 37 नगरसेवक असताना, सर्व 32 प्रभागात राष्ट्रवादीने लक्ष केंद्रीत केले आहे. त्या-त्या प्रभागात सर्वांधिक मतदारांकडून अर्ज भरून घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अधिकाधिक मतदारांची नोंदणी करून प्रभाग मजबूत करण्यावर भर दिला जात आहे. या माध्यमातून मतदारांपर्यंत थेट संपर्क साधला जात आहे. त्यातून पक्षाला नवसंजीवणी देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

वाण नाही, पण गुण लागला

राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात महायुतीत भाजपासोबत आहे. भाजपाकडून मतदार याद्यावर लक्ष देत पनाप्रमुखांची नेमणूक केली जाते. शिस्तबद्द नियोजन करून प्रत्येक मतदारांवर लक्ष ठेवण्याचे काम पक्षाकडून केले जाते.

त्या पद्धतीने राष्ट्रवादीने गांभीर्याने पावले उचलली आहेत. मतदार पडताळणीत मोहिमेचे नियोजन करून प्रत्येक प्रभागातील मतदारांचे नाव नोंदवले जावे, यासाठी आराखडा आखण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला भाजपचा वाण नाही तर, गुण लागल्याचे दिसत आहे.

शहरावर पकड मजबूत करण्याचा प्रयत्न

पिंपरी-चिंचवड महापालिकेवर राष्ट्रवादीची मजबूत पकड होती. शहरातील प्रमुख नेतेमंडळी, पदाधिकारी, नगरसेवक हे राष्ट्रवादीसोबत होते. त्यामुळे साहजिकच राष्ट्रवादी बाजी मारत होती. मात्र, भाजपाने त्यांचे नगरसेवक व पदाधिकारी फोडत, मोदी लाटेत फेब्रुवारी 2017 ला महापालिका काबीज केली.

जानेवारी 2026च्या निवडणुकीत पुन्हा भाजपने सत्ता मिळवली. शहरावरील कमकुवत झालेली पकड अधिक मजबूत करण्यासाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून सत्ताधारी भाजपच्या चुकीच्या कारभारावर बोट ठेवत आरोपाचे सत्र राबवले जात आहे. सभागृहातही भाजपला शह देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT