सायबर क्राईम pudhari
पिंपरी चिंचवड

नॅशनल सायबर क्राईम पोर्टलवर आयटी हब परिसरातून सर्वाधिक तक्रारी

‘आयटीयन्स’ सायबर चोरट्यांच्या जाळ्यात

पुढारी वृत्तसेवा

यंत्रणांच्या हातावर तुरी देत सायबर चोरट्यांनी राज्यभर अक्षरशः धुडगूस घातला आहे. चालू वर्षात महाराष्ट्रातील 5 हजार कोटी इतक्या मोठ्या रकमेवर स्कॅमर्सने डल्ला मारल्याची नोंद आहे. दरम्यान, अकरा महिन्यांत पिंपरी-चिंचवड शहरातील 20 हजार 688 जणांनी नॅशनल सायबर क्राईम पोर्टलवर तक्रारी केल्या असून, यामध्ये तब्बल 429 कोटी रुपये सायबर चोरट्यांनी लांबवले आहेत.

स्कॅमर्सच्या भूलथापांना बळी पडलेल्यांपैकी सर्वाधिक म्हणजेच 3 हजार 566 जण ‘आयटी’मध्ये काम करणारे आहेत. त्यामुळे उच्चशिक्षितही सायबर चोरट्यांच्या जाळ्यात अडकत असल्याचे अधोरेखित होत आहे.मागील काही वर्षांपासून ‘स्ट्रीट क्राईम’च्या तुलनेत सायबर गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. यावर अंकुश ठेवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. यातील विशेष म्हणजे उच्चशिक्षितांनादेखील सायबर गुन्हेगार टार्गेट करू लागले आहेत. मागील अकरा महिन्यांचा आढावा घेतला असता उच्चशिक्षित तरुणांना सायबर चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात गंडा घातल्याची पोलिस दफ्तरी नोंद आहे.

7 हजार 793 अर्जांची निर्गती

मागील अकरा महिन्यांत शहरातील 20 हजार 688 जणांची फसवणूक झाली असून, तब्बल 429 कोटी रुपये लांबवल्याची नोंद आहे. यातील 7 हजार 793 अर्जांची निर्गती करण्यात आली आहे. यातील काहीजणांचे पैसे माघारी मिळवून देण्यात, तर काही जणांचे पैसे होल्ड करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.

सायबर साक्षरतेची गरज

सामान्य आणि वारंवार नोंदवल्या जाणार्‍या सायबर गुन्ह्यांमध्ये सायबर स्टॉकिंग, पोर्नोग्राफी, मॉर्फिंग, ऑनलाइन छळ, बदनामीकारक किंवा त्रासदायक संदेश, ट्रोलिंग किंवा गुंडगिरी, ब्लॅकमेलिंग, धमकी देणे, ई-मेलद्वारे फसवणूक, तोतयागिरी आदींचा समावेश आहे. फसवणूक टाळायची असल्यास सायबर साक्षर होणे गरजेचे असल्याचे पोलिसांचे मत आहे.

पोलिसही अवाक्

हिंजवडी आयटी परिसरात आयटीयन्सची संख्या मोठी आहे. इतरांच्या तुलनेत आयटीयन्सना ऑनलाईन तंत्रज्ञान माहिती जास्त असते; मात्र तरीदेखील हिंजवडी पोलिस ठाण्यात येणार्‍या तक्रारींमध्ये आयटीयन्सची संख्या मोठी आहे. फसवणुकीच्या घटनांमध्ये उच्चशिक्षितांची संख्या पाहून पोलिसही अवाक् होत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT