पिंपरी: पावसाळ्यामुळे सर्वत्र पाणी साचणे व ओलसरपणाचे प्रमाण वाढले असून, डेंगी व मलेरियासारख्या आजारांचा धोका गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागाने डास निर्मूलन मोहिमेला गती दिली आहे.
घरोघरी व इतर ठिकाणी जाऊन तपासणी करण्यात येत आहे. आत्तापर्यंत 13 हजार घरांत डासांची उत्पत्ती ठिकाणी आढळून आली आहेत. तर, 4 हजार जणांना नोटीसा बजावण्यात आल्यात आहेत. शहरातील 988 नागरिक व आस्थापनांवर दंडात्मक कारवाई करत, 35 लाख 81 हजार रुपये दंड वसूल केला आहे. (Latest Pimpri News)
पावसामुळे अंगणात, छपरांवर, बांधकामस्थळांवर, भंगाराच्या ठिकाणी तसेच विविध कंटेनरमध्ये पाणी साचून डासांची उत्पत्ती होते. ते थांबवण्यासाठी औषध फवारणी, घरांची व कंटेनर तपासणी, भंगार दुकाने व बांधकाम स्थळांची पाहणी केली जात आहे. तसेच, जनजागृती आणि दंडात्मक कारवाईवर विशेष भर देण्यात आला आहे. कारवाई तीव्र करण्यात आली आहे.
आरोग्य विभागाच्या पथकाने आत्तापर्यंत 81 लाख 32 हजार 89 घरांची तपासणी केली आहे. त्यापैकी 12 हजार 814 घरांमध्ये डास वाढीस पोषक स्थिती आढळून आली आहे. 43 लाख 32 हजार 530 कंटेनरपैकी 13 हजार 864 कंटेनरमध्ये डासांची उत्पत्ती ठिकाणे निर्देशनास आली आहेत. एक हजार 703 भंगार दुकाने व गोदामाची तपासणी करण्यात आली.
शहरातील 1 हजार 999 बांधकाम स्थळांवर पाणी साचल्याचे निदर्शनास आले आहे. एकूण 3 हजार 953 जणांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. एकूण 988 नागरिक, व्यावसायिक, दुकानदार, बांधकाम व्यावसायिक, ठेकेदार व कंपन्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एकूण 35 लाख 81 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
दरम्यान, आरोग्य विभागाकडून शहरात औषध फवारणी केली जात आहे. घरोघरी माहितीपत्रके वितरण करण्यात आली आहेत. शाळांत विद्यार्थ्यांसाठी जनजागृती प्रशिक्षण देण्यात येत आहे. क्षेत्रीयस्ततरावर विशेष जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले आहेत.
परिसरात स्वच्छता राखा
पावसामुळे डेंग्यू-मलेरियाचा धोका अधिक वाढतो. या पार्श्वभूमीवर औषध फवारणी, आरोग्य तपासण्या, औषध उपचार यांसह सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. नागरिकांनी आपल्या परिसरातील पाणी साचू देऊ नये आणि स्वच्छता राखावी. डेंगीसदृश लक्षणे दिसल्यास त्वरित महापालिका रुग्णालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी केले आहे.
घराभोवती पाणी साचू देऊ नका
डेंगी व मलेरियाचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य विभाग सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. नागरिकांनीही आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. घराभोवती साचलेले पाणी काढून टाकावे. पावसाळ्यातील स्वच्छता हीच आजारांपासूनची खरी बचावात्मक ढाल आहे, असे उपायुक्त सचिन पवार यांनी सांगितले.