पिंपरी: मोशी येथील गट क्रमांक 327 येथे नागपूर येथील भारतीय प्रबंध संस्थान (आयआयएम)चे प्रशिक्षण आणि शिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. त्या संस्थेला 28 हेक्टर जागा प्रथम 49 वर्षांसाठी त्यानंतर पुन्हा 49 वर्षासाठी असे एकूण 98 वर्षांसाठी दरवर्षी 1 रुपया नाममात्र दराने देण्यास पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाने नुकतीच मान्यता दिली आहे. त्यामुळे मोशीत त्या नामांकित शैक्षणिक संस्था उभी राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती आमदार महेश लांडगे यांनी मंगळवारी (दि.14) दिली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विकास आराखड्यानुसार रिक्रीएशन कॉम्प्लेक्सचे आरक्षण आहे. ते बदलून शैक्षणिक प्रयोजन करण्याच्या अटीवर ती जागा भाडेपट्टयाने प्रदान करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
त्याला मंत्रिमंडळाच्या 21जून2026च्या बैठकीत मंजुरी दिली होती. त्या 28 हेक्टर जागेत आयआयएमकडून शैक्षणिक व प्रशिक्षण संकुल उभारण्यात येणार आहे. या शैक्षणिक संकुलात अल्पमुदतीचे प्रशिक्षण कार्यक्रम किंवा व्यवस्थापन विकास कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्रातील उद्योजक, शासकीय अधिकारी, शासकीय कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना प्राधान्य किंवा सवलत देण्यात येणार आहे.
जागेची पाहणी करण्यात आली असून, ती मोकळी असल्याचे 5 फेब्रुवारी 2025 ला सादर करण्यात आला आहे. त्यानुसार, 28 हेक्टर जागा आयआयएम संस्थेला नाममात्र दराने भाडेपट्ट्याने देण्यास पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाने नुकतीच मान्यता दिली आहे.