Moshi Garbage Depot Pudhari
पिंपरी चिंचवड

Moshi Garbage Depot Accident: महिन्याभरातच आई-वडिलांचे छत्र हरपले; मृत कामगाराच्या पत्नीने उचलले टोकाचे पाऊल

दोन चिमुकल्या पोरक्या; आर्थिक मदतीवरून छळ झाल्याचा माहेरच्यांचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: मोशी कचरा डेपो दुर्घटनेत पतीला गमावल्याच्या धक्क्यातून सावरण्यापूर्वीच २३ वर्षीय सोनाली नागेश गायकवाड यांनी राहत्या घरी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. ही घटना बुधवारी (दि. १२) रात्री साडेआठच्या सुमारास संजय गांधीनगर, मोशी येथे घडली.

अवघ्या महिन्याभराच्या अंतरात आधी वडील आणि आता आईही गेल्याने श्रेया आणि प्रिया या दोन चिमुकल्या पोरक्या झाल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

महिन्याभरापूर्वी मोशी येथे झालेल्या भीषण इमारत दुर्घटनेत एकूण नऊ कामगारांचा मृत्यू झाला होता. त्यामध्ये नागेश गायकवाड यांचाही समावेश होता. पतीच्या अचानक मृत्यूनंतर सोनाली मानसिक तणावात असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, काल रात्री त्यांनी राहत्या घरी गळफास घेतला. घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट आढळून आलेली नाही. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलिस तपास करीत आहेत.

मदतीची रक्कम नुकतीच मिळाली

नागेश गायकवाड यांच्या कुटुंबीयांना महापालिकेकडून १० लाख रुपयांची मदत नुकतीच मिळाली होती. त्यानंतर कंपनीकडून ४० लाख रुपये, तर राज्य शासनाकडून पाच लाख रुपयांची मदत मिळणार होती. पूर्ण मदत मिळण्यापूर्वीच सोनाली यांनी जगाचा निरोप घेतला.

पैशांसाठी मुलीचा जीव घेतला

नागेश यांच्या मृत्यूनंतर मिळणाऱ्या आर्थिक मदतीच्या रकमेसंदर्भातील वादातून सोनाली यांना त्रास देण्यात आला आणि त्यातूनच त्यांचा जीव गेल्याचा गंभीर आरोप त्यांच्या आई मीरा वकटे आणि वडील लोभाजी वकटे यांनी केला आहे.

पतीच्या मृत्यूनंतर मुलीला आधार देण्यासाठी सोनाली यांचे आई-वडील गेल्या महिनाभरापासून मोशीतच राहत होते. संजय गांधीनगर परिसरात मुलीच्या घराजवळ त्यांनी तात्पुरता मुक्काम केला होता. सोनाली यांच्या मृत्यूची माहिती मिळताच माहेरच्या नातेवाइकांनी मोठा आक्रोश केला.

नातेवाईकांचा एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात ठिय्या

सोनाली यांचा मृत्यू आत्महत्या नसून, खून असल्याचा आरोप करीत सासरे, सासू, दीर, नणंद आणि इतर नातेवाइकांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी माहेरच्या नातेवाइकांनी केली आहे. या मागणीसाठी सोनाली यांचे नातेवाईक बुधवारी सायंकाळपासून एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात ठाण मांडून बसले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT