संतोष शिंदे
पिंपरी: मोशी कचरा डेपोतील इमारतीखाली तब्बल चार दिवस अडकून पडलेल्या आठ कामगारांची अखेर मरणानेच सुटका केली. त्यांना जिवंत बाहेर काढण्यासाठी सलग चार दिवस मोहीम राबवण्यात आली. अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या सहाय्याने ढिगारा हटवून प्रत्येक थर काळजीपूर्वक काढण्यात आला. मात्र, मावळत गेलेली आशा अखेर शनिवारी (दि. ११) पूर्णपणे संपुष्टात आली. ढिगाऱ्याखालून आठही कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून इमारतीपासून दूरवर असलेल्या एका कामगाराचा शोध अद्याप सुरू आहे.
बुधवार (दि. ८) दुपारी मोशी येथील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या कार्यालयीन इमारतीवर कचऱ्याचा प्रचंड डोंगर कोसळल्यानंतर २३ कामगार ढिगाऱ्याखाली अडकले होते. त्यापैकी ५ कामगारांनी प्रसंगावधान राखत इमारतीतून उड्या मारून स्वतःचा जीव वाचविला, तर ९ जणांना बचाव पथकाने सुखरूप बाहेर काढले. मात्र, उर्वरित ९ कामगारांचा कोणताही ठावठिकाणा लागत नसल्याने संपूर्ण यंत्रणा त्यांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर कामाला लागली होती.
दुर्घटनास्थळी एनडीआरएफ, भारतीय लष्कर, महापालिकेचे अग्निशामक दल, पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे शेकडो जवान सलग तीन दिवस अहोरात्र कार्यरत होते. पोकलेन, जेसीबी, डंपर, क्रेन आणि अत्याधुनिक स्लॅब कटर मशीनच्या सहाय्याने कचऱ्याचा डोंगर हटविण्याचे काम सुरू होते. इमारतीची अस्थिर रचना, मिथेन वायूचा धोका, पावसामुळे चिखलात रूपांतर झालेला कचरा आणि दुर्गंधी यामुळे बचावकार्यात मोठ्या अडचणी येत होत्या. तरीही एखादा कामगार जिवंत सापडेल, या आशेवर प्रत्येक थर अत्यंत सावधगिरीने हटविण्यात आला.
दरम्यान, गुरुवार (दि. ९) एका कामगाराचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर सलग दोन दिवस शोध मोहीम सुरू होती. त्यानंतर शनिवार (दि. ११) सकाळी बचाव पथकाने इमारतीच्या आतील भागात प्रवेश करून शोधमोहीम अधिक तीव्र केली. काही वेळातच एकामागून एक मृतदेह बाहेर काढण्यात येऊ लागले. कचरा आणि चिखलाने माखलेले मृतदेह पाहताच घटनास्थळी उपस्थित नातेवाईकांनी हंबरडा फोडला. अनेक महिला रडून व्याकुळ झाल्या, तर काही जण मृतदेहाला मिठी मारून अश्रू ढाळत होते. गेल्या तीन दिवसांपासून तहान-भूक विसरून आपल्या माणसाची वाट पाहणाऱ्या कुटुंबीयांच्या डोळ्यांसमोर अखेर त्यांच्या प्रियजनांचे निर्जीव देह आल्याने आशेचे रूपांतर क्षणात आक्रोशात झाले.
सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यामुळे रुग्णालय परिसरातही शोककळा पसरली होती. प्रत्येक ॲम्ब्युलन्स रुग्णालयात दाखल होताच नातेवाईकांची धावपळ सुरू होत होती. कोणी आपल्या भावाचा शोध घेत होते, तर कोणी वडिलांचा, मुलाचा किंवा जवळच्या नातेवाईकाचा. रडण्याचा आवाज, एकमेकांना धीर देण्याचा प्रयत्न आणि मृतांची ओळख पटविण्यासाठी सुरू असलेली धावपळ यामुळे संपूर्ण परिसर सुन्न झाला होता. संभाव्य तणाव लक्षात घेऊन रुग्णालयातही मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
नियतीसमोर प्रयत्न अपुरे
मागील तीन दिवसांत एनडीआरएफ, भारतीय लष्कर, अग्निशामक दल, महापालिका आणि पोलिसांच्या शेकडो जवानांनी अक्षरशः जीव धोक्यात घालून बचावकार्य केले. इमारतीचे स्लॅब कोसळण्याची भीती, कचऱ्यातून बाहेर पडणारा मिथेन वायू, रासायनिक पाणी आणि सततचा पाऊस अशा प्रतिकूल परिस्थितीतही बचावकार्य थांबविण्यात आले नाही. मध्य रात्री अत्याधुनिक स्लॅब कटर मशीन मागवून इमारतीत सुरक्षित प्रवेशमार्ग तयार करण्यात आला. मात्र, नियतीसमोर सर्व प्रयत्न अपुरे ठरल्याचे बोलले जात आहे.
वामन कसबे यांचा शोध अद्यापही सुरूच
दुर्घटनास्थळी वामन कसबे यांचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. त्यांनी बुधवार (दि. ८) कचरा डेपोमध्ये हजेरी लावल्याची नोंद आहे. मात्र, प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार त्यांनी दुर्घटनाग्रस्त प्रशासकीय इमारतीत प्रवेश केलाच नाही. काहींनी त्यांचा मृतदेह मुख्य इमारतीपासून काही अंतरावरील कचऱ्याखाली गाडला गेल्याची शक्यता व्यक्त केली होती. त्यानुसार, बचाव पथकाने त्या परिसरातही शोधमोहीम राबविली. मात्र, ते नेमके कोणत्या ठिकाणी अडकले आहेत, याबाबत ठोस माहिती उपलब्ध नसल्याने शोधकार्यात अडचणी येत आहेत.
प्रसंगावधानामुळे वाचले पाच कामगार
दुर्घटना घडताच अशोक गुप्ता, मुनेंद्र कुमार, चंद्रशेखर सिंह, दिनेश सुतार आणि श्री बाला यांनी प्रसंगावधान राखत दुमजली प्रशासकीय इमारतीतून उड्या मारून स्वतःचा जीव वाचविला. कचऱ्याचा डोंगर कोसळताच त्यांनी तातडीने बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने आणखी जीवितहानी टळली.
दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कामगारांची नावे
मोशी कचरा डेपो दुर्घटनेत भावेश वाणी, महेश कुंभार, सनी माने, राहुल गायकवाड, सुनील कोरके, अक्षय सावंत, रणजीत पाटील आणि नागेश गायकवाड या आठ कामगारांचा मृत्यू झाला आहे. सलग चार दिवस सुरू असलेल्या बचाव मोहिमेत त्यांचे मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले.
नऊ कामगारांची सुखरूप सुटका
एनडीआरएफ, भारतीय सैन्य दल, महापालिकेचे अग्निशामक दल आणि अन्य यंत्रणांनी सलग चार दिवस चाललेल्या बचाव मोहिमेत सोमनाथ शेळके, सचिन दवडगाव, दादासाहेब आरडे, सुजाता शिंदे, रामप्रताप चव्हाण, रणवीर सिंह, विजय सपकाळ, भूषण पाटील आणि महेश राऊत या नऊ कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळविले.