Metro  Pudhari
पिंपरी चिंचवड

Maval Metro Project: मावळात मेट्रो कधी येणार?

पुणे-पिंपरी चिंचवड मेट्रोचे जाळे वाढते; मात्र मध्यवर्ती मावळ तालुका अजूनही प्रतीक्षेत

पुढारी वृत्तसेवा

गणेश विनोदे

वडगाव मावळ: पुणे, पिंपरी- चिंचवड शहराबरोबरच शिवाजीनगर ते हिंजवडी, निगडी ते चाकण, पुणे ते हडपसर, असे मेट्रोचे मार्ग तयार करून या दोन्ही शहरांलगत असलेले हवेली, मुळशी, खेड, पुरंदर हे तालुके मेट्रोने जोडण्याचा प्रयत्न सुरू आहे; परंतु पुणे, पिंपरी-चिंचवड आणि मुंबई या महानगरांच्या मध्यावर असलेल्या मावळ तालुक्याला जोडण्यासाठी मेट्रो प्रकल्प उभारण्याबाबत मात्र अद्याप कुठलीही मागणी, प्रस्ताव किंवा चर्चा झालेली दिसत नाही. त्यामुळे मावळात मेट्रो कधी येणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पुणे, पिंपरी चिंचवड आणि मुंबई या महानगरांच्या मध्यावर असलेला मावळ तालुका हा सोन्याचा तुकडा म्हणून ओळखला जातो. विशेषता पुणे, मुंबईला जोडण्यासाठी जुन्या काळात झालेला रेल्वे मार्ग असेल किंवा जुना राष्ट्रीय महामार्ग असेल यानंतर द्रुतगती महामार्गही तयार झाला. रिंगरोडचे कामही सुरू आहे. हे सर्व मार्ग मावळ तालुक्यातून गेल्याने मावळला दळणवळणाच्यादृष्टीने विशेष महत्त्व प्राप्त झाले.

अलीकडच्या काळात प्रामुख्याने पुणे शहरामध्ये महामेट्रोच्या माध्यमातून मेट्रो प्रकल्प सुरू झाला. त्यानंतर पिंपरी ते स्वारगेट हा मेट्रो मार्गही सुरू झाला असून लवकरच हा मार्ग निगडी पर्यंत सुरू होणार आहे. याशिवाय महा मेट्रोच्या माध्यमातून निगडी ते चाकण असा नवा मेट्रो प्रकल्प उभारण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू आहे. तसेच पीएमआरडीए च्या माध्यमातून शिवाजीनगर ते हिंजवडी हा मेट्रो प्रकल्प करण्यात आला आहे.

अद्याप मागणी, प्रस्ताव किंवा चर्चा का नाही ?

मावळ तालुक्यात होत असलेला पर्यटन विकास, औद्योगिकीकरण, शैक्षणिक संस्थाचा विस्तार पाहता मावळ तालुकाही पुणे व पिंपरी चिंचवड शहराला मेट्रोने जोडणे अत्यंत आवश्यक झाले आहे, परंतु मेट्रोचे जाळे सगळीकडे पसरत असताना मावळात मेट्रो यावी म्हणून आतापर्यंत कुठलीही मागणी प्रस्ताव किंवा चर्चा झालेली दिसत नाही. मग मावळात मेट्रो नेमकी कधी येणार? मावळात मेट्रो प्रकल्प आणण्याबाबत प्रयत्न का होत नाही असे प्रश्न निर्माण होत आहेत.

का हवाय मावळात मेट्रो प्रकल्प ?

वास्तविक पुणे व मुंबई या दोन महानगरांच्या वाहतुकीच्यादृष्टीने मावळ तालुका हा अत्यंत महत्त्वाचा आहे. मावळ तालुक्यामध्ये जागतिक दर्जाची तळेगाव एमआयडीसी असेल किंवा उर्से, टाकवे, कान्हे येथील वाढते औद्योगीकरण, तालुक्यात वाढत असलेले शैक्षणिक संस्थांचे जाळे व यामुळे मावळ तालुक्यातील नागरिकांचा पुणे, पिंपरी चिंचवड शहराशी वाढत असलेला संपर्क पाहता त्यादृष्टीने वाहतुकीची साधनेही वाढणे आवश्यक आहे. याशिवाय नैसर्गिक देणगी असलेल्या मावळ तालुक्यात लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना हे गडकिल्ले, कार्ला, भाजे, बेडसे या लेण्या, पवना, आंद्रा या धरणांसह अनेक छोटी मोठी धरणे, लोणावळा खंडाळा ही थंड हवेची ठिकाणे, गहुंजे येथील क्रिकेट स्टेडियम, कार्ला येथील एकवीरा देवी मंदिर, शिरगाव येथील प्रति शिर्डी मंदिर, दुधीवरे येथील प्रति पंढरपूर मंदिर अशी अनेक पर्यटनस्थळे विकसित झाली आहेत. सर्वांत महत्त्वाचे आमदार सुनील शेळके यांच्या विशेष प्रयत्नातून दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्राधान्याने मंजुरी दिलेल्या लोणावळा येथील ग्लास स्काय वॉक प्रकल्प म्हणजे मावळच्या पर्यटनाच्यादृष्टीने महत्वाचा प्रकल्प ठरणार आहे.

तीन तालुक्यांत मेट्रोचे जाळे!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये हडपसर ते लोणी काळभोर, हडपसर बस डेपो ते सासवड रोड या नव्या मेट्रो प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे. पुणे शहरातील रामवाडी ते वाघोली दरम्यान मेट्रो प्रकल्पालादेखील मान्यता देण्यात आली आहे. एकंदर पुणे व पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरांमध्ये मेट्रोचे जाळे विणले जात असून, शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो प्रकल्पाने मुळशी तालुका तर निगडी ते चाकण मेट्रो प्रकल्पाने खेड तालुका हडपसर ते सासवड मेट्रो प्रकल्पाने पुरंदर तालुका असे तीन तालुके या मेट्रो प्रकल्पांच्या माध्यमातून जोडले जाणार असून, हवेली तालुक्यात मेट्रोचे जाळे मोठ्याप्रमाणात पसरले जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT