Voting  Pudhari
पिंपरी चिंचवड

Maval Gram Panchayat Elections: मावळमध्ये ७३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची लगीनघाई; आरक्षण सोडत प्रक्रिया पूर्ण

पावसाळ्यानंतर एकाच वेळी निवडणुका होण्याची शक्यता; १० जुलैला अंतिम आरक्षण जाहीर होणार

पुढारी वृत्तसेवा

वडगाव मावळ: राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मावळ तालुक्यातील गेल्या ३ वर्षांत मुदत संपलेल्या ७३ ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत प्रक्रिया नुकतीच पार पडली. यामुळे निवडणुकीची लगीनघाई सुरू झाली असून, तालुक्यातील एकूण १०३ पैकी तब्बल ७३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बार पावसाळ्यानंतर एकाच वेळी उडण्याची शक्यता आहे.

सन २०२४, २०२५ व २०२६ या तीन वर्षांत मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची प्रभागरचना व त्यानंतर नुकतीच आरक्षण सोडत प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पार पडली. मावळ तालुक्यात तहसीलदार विक्रम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार गणेश तळेकर यांच्या अधिपत्याखाली या ७३ ग्रामपंचायतींमध्ये १२ जून रोजी आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली.

जिल्हाधिकाऱ्यांची स्वाक्षरी झाल्यानंतर संबंधित आरक्षण सोडत प्रारूप प्रसिद्धी १९ जून रोजी होणार असून त्यानंतर २५ जूनपर्यंत सूचना व हरकती दाखल करण्यासाठी मुदत आहे. १० जुलै रोजी अंतिम आरक्षण सोडत जाहीर होणार आहे. त्यानंतर मतदार यादी कार्यक्रम होणार असून पावसाळ्यानंतरच संबंधित ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पहिल्यांदाच होणार एकत्रित निवडणूक!

मावळ तालुक्यात एकूण १०३ ग्रामपंचायती असून, त्यापैकी तब्बल ७३ ग्रामपंचायतीची निवडणूक एकाच वेळी होणार आहे. यापूर्वी किमान ५० ग्रामपंचायतीची निवडणूक एकाचवळी होत असे व इतर ग्रामपंचायतीची निवडणूक त्या त्या वेळी होत असे. परंतु एकाच वेळी ७३ ग्रामपंचायतींची निवडणूक होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

'या' ग्रामपंचायतींची होणार निवडणूक

कान्हे, खडकाळा, महागाव, कोथुर्णे, कुरवंडे, कुसगाव खु., गहुंजे, उर्से, बऊर, येलघोल, कुसगाव प.मा., आढले खु, मोरवे, अजिवली, करंजगाव, आँढे खु., वेहेरगाव, ठाकुरसाई, कडधे, धामणे, साते, तिकोणा, दारुंब्रे, शिलाटणे, टाकवे खुर्द, कांब्रे ना. मा., शिवली, पाचाणे, केवरे, काले, गोवित्री, साई, घोणशेत, मळवली, ताजे, खांडशी, नवलाख ऊंब्रे, नाणोली तर्फे चाकण, वराळे, ओझर्डे, पुसाणे, सांगवडे, शिवणे, थुगाव, आढे, येळसे, आंबी, सोमाटणे, माळेगाव बु, तुंग, आपटी, माळवाडी, करूंज, आंबेगाव, जांभूळ, वडेश्वर, डाहुली, मळवंडी ठुले, वारु, परंदवडी, उकसान, पाटण, कशाळ, शिरदे, खांड, कार्ला, चिखलसे, इंगळून, कुसवली, डोंगरगाव, कुसगाव बु., नाणे, टाकवे बु.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT