Political News - राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. शहरातील पिंपरी, चिंचवड, भोसरी तसेच मावळ विधानसभा मतदारसंघात कोणाला उमेदवारी मिळणार, याची उत्सुकता ताणली गेली आहे. उमेदवार निश्चित झाल्यानंतर विधानसभा लढतीचे चित्र अधिक स्पष्ट होऊन, प्रचाराची रंगत निश्चितच वाढणार आहे.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता मंगळवारी (दि.15) लागू झाली आहे. 29 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. अर्ज माघारीच्या 4 नोव्हेंबरच्या मुदतीनंतर प्रत्यक्ष रिंगणातील उमेदवारांचे चित्र स्पष्ट होईल.
मागील लोकसभेप्रमाणे महायुती आणि महाविकास आघाडी या दोन प्रमुख आघाड्यांत लढत रंगेल, असे चित्र आहे. त्यामध्ये मनसे, वंचित बहुजन आघाडी व इतर पक्षाचे उमेदवारही निवडणुकीत दिसतील. पक्षाच्या उमेदवारीसाठी तीव्र स्पर्धा असल्याने बंडखोर तसेच, अपक्षांचा भरणा असेल.
महायुती व महाविकास आघाडीत कोणत्या पक्षाकडे कोणती जागा जाणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. प्रत्येक पक्ष पिंपरी, चिंचवड व भोसरीसह मावळ मतदारसंघावर दावा करीत आहे. पक्षाचे इच्छुक तसेच, पदाधिकारी त्या दृष्टीने दावे करीत आहेत.
इच्छुकांकडून तिकीट पक्के करण्यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेण्यासह मुंबईच्या वार्या वाढल्या असून, वेगवेगळ्या माध्यमातून शिफारस करण्याचे तंत्र वापरले जात आहे. शहरातील पिंपरी हा मागासवर्गीय राखीव मतदारसंघ आहे. सध्या येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार आहे. महायुतीतील भाजपसह आरपीआयनेदेखील पिंपरी मतदारसंघावर दावा केला आहे.
तेथे सर्वच पक्षातून इच्छुकांची संख्या वाढतच आहे. तिकीटासाठी मोठी रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून येत आहे. महाविकास आघाडीतील कोणत्या पक्षाकडे ही जागा जाईल, याबाबत दावे प्रतिदावे केले जात आहेत. त्याबाबत राजकीय वर्तुळात व मतदारांत जोरदार चर्चा रंगत आहेत.
राज्यात दुसर्या क्रमांकाचा सर्वात मोठा मतदारसंघ असलेल्या चिंचवडची जागा भाजपकडे आहे. भाजपमध्येच इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमांचा सपाटा लावला आहे. तर, आघाडीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार व शिवसेना उद्धव ठाकरे पक्षापैकी कोणाला जागा सुटणार याचे वेगवेगळे दावे केले जात आहे. तुतारी हाती घेण्यासाठी अनेकांनी शड्डू ठोकले आहेत.
भोसरी मतदारसंघही भाजपकडेच आहे. उद्धव ठाकरे पक्षासह शरदचंद्र पवार पक्षाचे इच्छुक तयारीला लागले आहेत; मात्र कोणत्या पक्षाला जागा सुटणार हे स्पष्ट झालेले नाही. मावळ राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. त्या मतदारसंघावर महायुतीतील भाजपने दावा केला आहे. तर, महाविकास आघाडीतून सक्षम उमेदवार देण्याबाबत पर्यायाची चाचपणी सुरू आहे.
तिकिटासाठी अन् तिकीट कापण्यासाठी धावपळ
तिकिटासाठी पक्षाच्या वरिष्ठांकडे गळ घालण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुकांनी मुंबई, नागपूरसह दिल्लीच्या अनेक चकरा मारल्या आहेत. वेगवेगळ्या माध्यमातून वरिष्ठांशी संवाद साधत आपणच कसे योग्य व सक्षम आहोत, याचे दाखले दिले जात आहेत. तर, संबंधिताला उमेदवारी देऊ नये म्हणूनही अनेक जण रिंगणात उतरले आहेत.
घराणेशाही, एकाच कुटुंबाला वारंवार संधी, निष्क्रीयता, लोकांत न मिसळणे, पक्ष कार्यक्रम व संघटनेत सक्रियपणे सहभागी न होणे आदी कारणे पुढे करीत संबंधिताला तिकीट देऊ नये म्हणून पक्षाच्या नेत्यांना इशारा देण्यात येत आहेत. या डावपेचात कोणाला यश मिळते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.