कलाटेंच्या माध्यमातून शरद पवार यांना विजयी करा: अमोल कोल्हे Pudhari
पिंपरी चिंचवड

कलाटेंच्या माध्यमातून शरद पवार यांना विजयी करा: अमोल कोल्हे

'शरद पवार यांचे पिंपरी-चिंचवड शहरावर व शहराच पवारांवर प्रेम आहे'

पुढारी वृत्तसेवा

Pimpri News: शरद पवार यांचे पिंपरी-चिंचवड शहरावर व शहराच पवारांवर प्रेम आहे. त्यामुळेच दोन दशकांनंतर साडेतीन तास रोड शो आणि सभेसाठी पवारांनी चिंचवड विधानसभेला वेळ दिली. कारण चिंचवडमध्ये भाकरी फिरवायची आहे. पिंपरी-चिंचवडला भविष्याची चांगली दिशा देऊन सर्वांगीण विकास करण्यासाठी पवारांचा कलाटेंवर विश्वास आहे.

त्यामुळे गेली 15 वर्षे फसलेले घराणेशाहीचे गणित सुधारून राहुल कलाटे यांच्या रूपाने शरद पवार साहेबांचा विचार विजयी करा. 84 वर्षांच्या त्या बापाला आठवा, आयुष्याच्या संध्याकाळी त्याला हरू द्यायचं नसतं, अशी भावनिक साद अमोल कोल्हे यांनी चिंचवडकर मतदारांना घातली.

चिंचवडमधील महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राहुल कलाटे यांच्यासाठी काल अमोल कोल्हे यांनी रावेत-किवळे भागात रोड शो केला; तसेच वाल्हेकरवाडी, काळेवाडी इथे सभेदरम्यान कोल्हे बोलत होते.

वारं फिरलंय, परिवर्तन अटळ!

आयटी पार्क - औद्योगिकनगरी म्हणून ओळख असलेल्या चिंचवडमध्ये नागरी समस्या, मूलभूत सोयीसुविधांची कमतरता कायम असल्याने नागरिकांमध्ये असंतोष आहे. त्यामुळे, कंत्राटदार, जमिनी हडपणार्‍यांना नाही, तर तुमच्या उपयोगी येणार्‍या राहुल कलाटे यांना एकदा संधी द्या. चिंचवड विधानसभेत तुमचे लोकप्रतिनिधित्व करणारा माणूस तुमच्यासाठी भांडणारा, तुमचे प्रश्न सोडवणारा हवा. त्यामुळे व्यवहार बघणार्‍या शेठपेक्षा आपला राहुल दादा हक्काचा आहे, असेही कोल्हे यांनी सांगितले.

चिंचवड मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राहुल कलाटे यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी वैयक्तिक गाठीभेटींवर आणि संवादावर भर दिला. गेले दहा दिवस मतदारसंघातील गावठाण, वस्त्यांसह उच्चभ्रू सोसायट्यांपर्यंत पोहोचत शहरातील विविध भागात बाईक रॅली, स्नेह मेळावे, कोपरा बैठका, जाहीर सभा, पदयात्रा, काढून कलाटे यांनी प्रचार केला.

वैयक्तिक गाठीभेटींवर त्यांचा भर राहिला. चिंचवडमधील भ्रष्टाचार कमी करून सर्वांगीण विकास साधण्यासाठी मला एकदा संधी द्या. कर्तृत्वशून्य घराणेशाहीला तुम्ही घरी बसवाल, यावर मला विश्वास आहे. आपला ईव्हीएमवरील अनुक्रमांक एक आहे. आपल्या सर्वांसाठी एक नंबरचेच दर्जेदार काम करण्याचं माझं वचन आहे असे राहुल कलाटे म्हणाले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT