पिंपरी: मकर संक्रांतीनिमित्त शहरातील बाजारपेठा सजल्या आहेत. तीळगूळ, तिळलाडू, चिक्की, पतंग याबरोबरच हलव्याचे दागिनेदेखील बाजारात उपलब्ध आहेत. यामध्ये नववधूचा तिळवा आणि लहान मुलांच्या बोरन्हाणसाठी विविध प्रकारचे हलव्याच्या दागिन्याचे खास सेट विक्रीस आले आहेत.
नवीन लग्न झालेल्या नवदांपत्यांसाठी मकरसंक्रांत हा सण आणखीनच खास असतो. शिवाय नवीन सून आणि जावयाचे लाड पुरवले जातात. नव्या सुनेला मकर संक्रांतीच्या दिवशी हलव्याचे दागिने घालून सुंदर तयार केले जाते.
काळ कितीही आधुनिक असो, पण काही परंपरा अजूनही जपल्या जात आहे. किंबहुना सोशल मीडियामुळे त्याची क्रेझ अजूनच वाढतच चालली आहे. अशात एका रितीनुसार मकरसंक्राती या सणात नववधू किंवा लहान बाळाची पहिली संक्रांत म्हणून त्यांना हलव्याचे दागिने घालून संक्रात साजरी करण्याची परंपरा आजही तितक्याच उत्साहाने साजरी होत आहे. संक्रातीच्या निमित्ताने घरात आलेल्या सुनेचे आणि जावयाचे किंवा नवजात बाळाचे कोडकौतुक म्हणून त्यांना हलव्याचे दागिने घालून हा सण थाटामाटात साजरा केला जातो.
नक्षीदार नेकलेसला मागणी
नववधूसाठी हलव्याच्या बांगड्या, कानातले, बाजूबंद, मांगटिका, हार, अंगठी, मंगळसूत्र, कंबरपट्टा तयार केला जातो, तर नवर्यासाठी घडी, हार, अंगठी, ब-ेसलेट असे अलंकार तयार केले जातात. पण आता याशिवायदेखील हे दागिने खूप डिझाइन्समध्ये उपलब्ध होतात. नवीन डिझाइन्समध्ये हलव्याचे नक्षीदार नेकलेस, पाटल्या मेखला, श्रीफळ, मुकुट, मोहनमाळ, लोंबते कानातले, चिंचपेटी, बोरमाळ, नथ, गजरा, पैंजणदेखील पाहायला मिळतात. संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत या दागिन्यांना मागणी आहे.
लहान मुलांसाठीदेखील या सणाचे विशेष महत्त्व आहे. पहिल्या वर्षात बाळासाठी काळ्या रंगाचे वस्त्र खरेदी केले जाते. हलव्याचे दागिने घातले जातात. त्यामुळे काळ्या रंगातील साड्या, लहान मुलींसाठी काळ्या खणातील व कापडातील फ्रॉक, परकर, पोलके, घागरा चोली, मुलांसाठी धोती कुर्ता असे विविध पर्याय उपलब्ध आहेत.