पिंपरी : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील दोन अधिकाऱ्यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. सहायक पोलिस आयुक्त विठ्ठल कुबडे यांना पोलिस दलातील उत्कृष्ट सेवेबद्दल तर पोलिस निरीक्षक अमोल फडतरे यांना पोलिस शौर्य पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे. या पदकांमुळे पिंपरी-चिंचवड पोलिस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
विठ्ठल कुबडे, सहायक पोलिस आयुक्त
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत पिंपरी विभागाचे सहायक पोलिस आयुक्त विठ्ठल कुबडे यांना राष्ट्रपतींचे पोलिस दलातील उत्कृष्ट सेवेबद्दल पदक जाहीर झाले. १५ सप्टेंबर १९९३ला कुबडे पोलिस सेवेत रुजू झाले. नाशिकच्या महाराष्ट्र पोलिस अकॅडमीतून प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांची पहिली नियुक्ती भंडारा येथे झाली. गोरेगाव, सालेकसा, शिवहोरा आदी नक्षली भागात त्यांनी काम केले. नक्षली चकमकीवेळी त्यांनी यशस्वी कामगिरी केली. नक्षली भागातील उत्कृष्ट कामगिरीनंतर परभणी, नांदेड, उस्मानाबाद आदी ठिकाणीही त्यांनी कामगिरीची चुणूक दाखवली. बुलडाणा येथे सहायक पोलिस निरीक्षक पदावर त्यांनी काम केले आहे. २००७ ते २०१५ या कालावधीत लातूरमध्ये काम केल्यानंतर १५ जून २०१५ ला त्यांना पिंपरी येथे काम करण्याची संधी मिळाली. दरम्यान, १५ ऑगस्ट २०१८ रोजी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय कार्यान्वित झाले. त्यावेळी आयुक्तालय स्थापनेच्या दिवशी कुबडे यांना राष्ट्रपतींचे पोलिस दलातील गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल पदक जाहीर झाले होते.
विठ्ठल कुबडे यांनी पिंपरी-चिंचवड पोलिस दलात वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून गुन्हे शाखेसह पोलिस ठाण्यांचे प्रभारी म्हणून चमकदार कामगिरी केली. त्यानंतर सहायक आयुक्त म्हणून पदोन्नती झाल्यानंतर वाहतूक शाखेसह विविध विभागांची जबाबदारी सांभाळत तडीपार, मोका, स्थानबद्ध, अशा विविध कारवाया करून गुन्हेगारांवर जरब बसविली. या कामगिरीबद्दल तत्कालीन पोलिस आयुक्त व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कुबडे यांचा वेळोवेळी सन्मान करण्यात आला आहे. यात त्यांना सेवाकाळात १२०० रिवार्ड तर साडेचारशे प्रशंसापत्र मिळाली आहेत. नक्षलग्रस्त जिल्ह्यांमध्ये काम केल्याबद्दल विशेष सेवा पदक, अंतरिक सेवा पदकही मिळालेले आहे. पोलिस महासंचालक यांचे मानाचे सन्मानचिन्हही मिळालेले आहे. पोलिस दलातील कर्तव्य काळात अतिशय उत्कृष्टरित्या सेवा केल्याबद्दल त्यांना उत्कृष्ट सेवेबद्दलचे पदक जाहीर झाले. कुबडे यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपतींचे पदक मिळाल्याने कौतुकाचा वर्षाव होत आहे.
अमोल फडतरे, पोलिस निरीक्षक
अमोल फडतरे यांनाही दुसऱ्यांदा राष्ट्रपतींचे पदक मिळाले आहे. फडतरे हे फेब्रुवारी २०१४ मध्ये पोलिस सेवेत उपनिरीक्षक म्हणून रुजू झाले. नाशिकच्या महाराष्ट्र पोलिस अकॅडमीतून प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर फेब्रुवारी २०१५ मध्ये गडचिरोली जिल्ह्यात पहिली नियुक्ती झाली. अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागात ‘सी-६०’ या कमांडो पथकात उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी केली. त्याबद्दल वेगवर्धीत पदोन्नती मिळून ते सहायक पोलिस निरीक्षक झाले. फडतरे यांनी कामगिरीचा आलेख उंचावत ठेवला. त्यामुळे २०२२ मध्ये पुन्हा वेगवर्धीत पदोन्नती मिळून ते पोलिस निरीक्षक झाले. पोलिस उपनिरीक्षक असलेले फडतरे यांनी अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागात उल्लेखनीय कामगिरी केल्याने पोलिस निरीक्षक पदापर्यंत त्यांना पदोन्नती मिळाली.
त्यानंतर सप्टेंबर २०२४ मध्ये पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत त्यांची चिखली पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक (गुन्हे) नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, २०२१ मध्ये पोलिस महासंचालक अंतरिक सेवा पदक, खडतर सेवा पदक मिळाले आहे. यासह यापूर्वी फडतरे यांना २०२१ मधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल २०२३मध्ये राष्ट्रपतींचे ‘पोलिस शौर्य पदक’ मिळाले होते. तसेच गडचिरोली जिल्ह्यातील कसनसूर–बोरिया जंगल परिसरात एप्रिल २०१८ मध्ये नक्षलविरोधी कारवाई अंतर्गत मोठ्या प्रमाणावर ऑपरेशन राबवण्यात आले. यामध्ये महाराष्ट्र पोलिसांच्या ‘सी-६०’ची दोन पथके सहभागी होती. या कारवाईचे नेतृत्व पोलिस निरीक्षक अमोल फडतरे यांनी केले. २०१८ मधील या कामगिरीची दखल घेत फडतरे यांना पुन्हा राष्ट्रपतींचे ‘पोलिस शौर्य पदक’ जाहीर करण्यात आले आहे. हे पदक दोनदा मिळविल्याने पोलिस निरीक्षक फडतरे यांच्यावरही कौतुकाचा वर्षाव होत आहे.