लोणावळा : लोणावळा शहरामध्ये सार्वत्रिक निवडणुकीसठी मागील काही दिवसांपासून युती व आघाडीमधील घटक पक्षांमध्ये चर्चांचे गुराळ सुरू आहे. मात्र, त्यामधून कोणताही निर्णय होत नसल्याने सर्वच राजकीय पक्षांकडून स्वबळाचा नारा सुरू झाला आहे. भारतीय जनता पक्षाने यामध्ये आघाडी घेतली असून, आपल्या 11 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. (Latest Pimpri chinchwad News)
आमदार सुनील शेळके यांनी लोणावळा शहरातील नगर परिषदेचे सार्वत्रिक निवडणूक सर्वच राजकीय पक्षांना एकत्र घेऊन साधक-बाधक पद्धतीने लढवण्याचे नियोजन केले होते. मात्र, निर्णय घेण्यास मोठा विलंब होत असल्यामुळे एकेक पक्ष लोणावळा शहर परिवर्तन विकास आघाडी अथवा युतीमधून बाहेर पडू लागला आहे. भाजप पक्षाने कमळावर त्यांचे उमेदवार देण्याचे पहिलेच घोषित केले होते. विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार शेळके यांच्या सोबत असलेला व महायुतीला मानणारा गट देखील भाजपामध्ये समाविष्ट झाला आहे. त्यानंतर आता काँग्रेस पक्षाने देखील काँग्रेसचे उमेदवार पंजा याच चिन्हावर उभे करण्याचे जवळपास निश्चित केले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून प्रभाग क्रमांक एकमध्ये प्रचाराचा नारळ फोडत प्रचाराचा शुभारंभ देखील केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, शिवसेना पक्ष व मनसे यांच्याकडून अद्याप अधिकृत उमेदवारांबाबतची घोषणा झालेली नाही. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने देखील नगराध्यक्ष पदाचा उमेदवार घोषित केला आहे. त्यामुळे आता शिवसेना अजित पवार पक्षाकडे एकला चलो असेच म्हणण्याची वेळ आली आहे.
मागील अनेक दिवस लोणावळा शहरातील बहुतांश राजकीय पक्ष हे आमदार शेळके यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या परिवर्तन विकास आघाडी अथवा युती याच्या माध्यमातून निवडणुका लढवण्यास उत्सुक होते. आता मात्र वेगळेच परिवर्तन लोणावळा शहरात सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांकडून लोणावळा शहरातील 13 प्रभागांमधील 27 उमेदवारांची शोधाशोध व चाचपणी वेगात सुरू झाली आहे. महत्त्वाच्या पक्षांकडून उमेदवारी मिळण्याची चिन्हे धुसर होऊ लागल्याने अनेक जण इतर पक्षाकडून उमेदवारी घेऊ लागले आहेत. भाजपाकडे सर्वच ठिकाणी मातब्बर उमेदवार दिसू लागल्यामुळे भाजपाचे पारडे लोणावळा शहरात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पूर्वसंध्येलाच जड दिसू लागले आहे. राजकारणामध्ये क्षणाक्षणाला बदल होत असल्यामुळे येणारा प्रत्येक दिवस व प्रत्येक क्षण हा राजकारणाला कलाटणी देणारा ठरणार आहे.
लोणावळा शहरामध्ये आजपर्यंत झालेल्या निवडणुका ह्या राजकीय पक्षांच्या चिन्हावर व स्वबळावरच लढण्याचा इतिहास आहे. यावेळी मात्र त्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न झाला मात्र तो यशस्वी होताना दिसत नसल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांकडून स्वबळाचा नारा ऐकू येऊ लागला आहे. सोमवारी 10 नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांत सर्वच राजकीय पक्षांची अधिकृत भूमिका व उमेदवार हे जाहीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अ) या सर्वच पक्षांकडे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत. भाजपा वगळता इतर सर्वच पक्षांची उमेदवार हे आमदार शेळके यांच्याकडेच उमेदवारी मागत होते. त्यामुळे नगराध्यक्ष पदाचा तिढा देखील सुटताना दिसत नव्हता. आता मात्र एक एक पक्ष हा आमदारांपासून वेगळा होताना दिसत असल्याने त्या त्या पक्षांना आपल्या उमेदवारांची घोषणा करावी लागणार आहे. उमेदवारी जाहीर होत नसल्यामुळे चकरा मारून इच्छुक अक्षरशः मेटाकुटीला आले आहेत.