लोणावळा: लोणावळा शहर पोलिसांनी एका कारवाईत मौजे नांगरगाव हद्दीतील ओमेगा सोसायटी परिसरातील 'देव व्हिला' येथे सुरू असलेल्या एका मोठ्या बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला आहे.
अमेझॉन आणि गुगलसारख्या नामांकित कंपन्यांचे बनावट अधिकारी असल्याचे भासवून अमेरिका, कॅनडा व इतर परदेशी नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या तब्बल २० जणांच्या टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी लॅपटॉप, मोबाईल, वाहने आणि रोकड असा एकूण ३६ लाख ४१ हजार ३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात कट रचून लोणावळ्यातील 'देव व्हिला' भाड्याने घेतला होता. या ठिकाणी बेकायदेशीर व अनधिकृत कॉल सेंटर सुरू करण्यात आले. आरोपी हे इंटरनेट आणि विविध मोबाईल-लॅपटॉप ॲप्सच्या साहाय्याने परदेशी नागरिकांशी संपर्क साधत असत.
ते स्वतःला अमेझॉन, गुगल आदी नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी असल्याचे भासवून अमेरिकेतील आणि कॅनडामधील नागरिकांना त्यांच्या पार्सलमध्ये अमलीपदार्थ (ड्रग्ज) सापडले असल्याची भीती दाखवत असत.
या माध्यमातून परदेशी नागरिकांवर दहशत निर्माण करून त्यांच्याकडून खंडणी वसूल केली जात होती. तसेच नागरिकांचे क्रेडिट कार्ड, एटीएम कार्डची गोपनीय माहिती मिळवून त्यांची फसवणूक केली जात होती. या गुन्ह्यात मिळालेली रक्कम आरोपी इरफान खान हा हवाला आणि क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून भारतीय चलनात रूपांतरित करून घेत असल्याचा पोलिसांचा संशय आहे.
पोलिसांची मोठी कारवाई
लोणावळा शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक महेश विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रवीण लोकरे व इतर पोलिस पथकाने ही धडक कारवाई केली आहे. आरोपींवर माहिती तंत्रज्ञान अधिनियम आणि इंडियन टेलिग्राम कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून, या रॅकेटमागे आणखी कोणाचे हात आहेत आणि यामध्ये किती मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाले आहेत, याबाबतचा सखोल तपास पोलिस निरीक्षक महेश विधाते करत आहेत.
मुख्य आरोपी आणि संशयित
अमान इम्तियाज शेख, मो. फैज ऊर्फ नाजिश आरिफ शेख, मोहम्मद अफजल शेख, कुलदीप मनोज बागडी, रिहान सलीम घनानी, मोहम्मद अलीरजा सय्यद, तावीश मेहबूब अली शेख, कामरान इसामुद्दीन शेख, सद्दाम चांद खान, सुजल खुमबहादुर राणा, अब्दुल आहात मोहम्मद रफिक खान, झहिय वाहिद खान, जाहीद आजम शेख, धनराज देवजीत बोस, शादाब जावेद सय्यद, इरफान अब्दुल गफुर शेख (कॉल सेंटर मालक), समीर इरफान शेख, इरशाद इरफान शेख, अमीर सिराज खान आणि मक्सूदन शमीम चौधरी (सर्व रा. मुंबई आणि इतर ठिकाणचे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांना आज न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
२० जणांवर गुन्हे दाखल
या प्रकरणी लोणावळा शहर पोलिस स्टेशनचे पोलिस हवालदार बाळासाहेब खडके यांनी फिर्याद दिली असून, त्यावरून एकूण २० आरोपींविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.