हुल्लडबाजी करणार्‍या 48 पर्यटकांवर कारवाई File Photo
पिंपरी चिंचवड

लोणावळा : हुल्लडबाजी करणार्‍या 48 पर्यटकांवर कारवाई

लोणावळा परिसरात धोकादायक पर्यटन करणार्‍यांना दणका

पुढारी वृत्तसेवा

लोणावळा : शहरातील भुशी धरण मार्गावर असलेल्या सहारा पुलाच्या पुढे असणार्‍या तीन धबधब्यांच्या वरील बाजूस डोंगरकड्यावर तसेच लायन्स पॉईंट, टायगर पॉईंट, घुबड तलाव, भुशी धरण परिसरात हुल्लडबाजी करणार्‍या 48 पर्यटकांवर वन विभाग आणि लोणावळा पोलिसांनी कारवाई केली आहे.

प्रशासनाच्या सूचनांकडे पर्यटकांचे दुर्लक्ष

भुशी धरणावर झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर तीन आठवड्यांपूर्वी पुणे जिल्हाधिकारी यांनी धोकादायक पर्यटनस्थळांवर जाण्यास बंदी घातलेली आहे. यातच सहारा पुलाच्या समोरच्या बाजूला असलेल्या तीन छोट्या धबधब्याच्या वरच्या बाजूला जाण्यासाठी पूर्णवेळ तसेच इतर काही पर्यटनस्थळांवर ठिकाणी जाण्यास सायंकाळी 6 नंतर पूर्णपणे प्रतिबंध घालण्यात आला आहे.

पोलिस, वनविभागाने फलक लावून, लाऊडस्पीकरवरून तशा सूचना पर्यटकांना देत असतात. मात्र, तरीही या सूचनांकडे कानाडोळा करून अनेक अतिउत्साही पर्यटक धाडस करायला जातात. त्यामुळे आता अशा पर्यटकांवर थेट कारवाई करण्याचे पाऊल पोलिस प्रशासन आणि वनखात्याने उचलले असून, गेल्या 15 दिवसांत 48 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

गेल्या आठवड्यात 17 पर्यटकांवर कारवाईचा बडगा उगारल्यानंतर लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी सत्यसाई कार्तिक मार्गदर्शनाखाली तसेच लोणावळा शहर पोलिस निरीक्षक सुहास जगताप यांच्या नेतृत्वाखाली प्रतिबंधित क्षेत्रात आढळून आलेल्या पर्यटकांवर शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे तीनही दिवस सलग कारवाइ केली आहे. शुक्रवारी 24, शनिवारी 5 तर रविवारी 2 अशा एकूण 31 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

वन विभाग, लोणावळा शहर पोलिसांची कारवाई

सहारा पुलाच्या पुढे असणार्‍या तीन धबधब्यांच्या वरील बाजूस डोंगरकड्यावर तसेच लायन्स पॉईंट, टायगर पॉईंट, घुबड तलाव, भुशी धरण परिसरातील धोकादायक ठिकाणी जाण्यास मनाइ करण्यात आली आहे. तरीही अनेक पर्यटक आदेश धुडकावून धोकादायकरित्या डोंगर चढून स्वतःचा जीव धोक्यात घालताना दिसत आहेत. अशा 48 पर्यटकांवर वन विभाग आणि लोणावळा शहर पोलिसांनी कारवाई केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT