पिंपरी: दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत, या रागातून तिघांनी मिळून एका तरुणाला आणि त्याच्या नातेवाईकांना सिमेंटच्या गट्टूने मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. 21) रात्री चिंचवड येथील गोल्डन चौक परिसरात घडली.
याबाबत साबिरअली मुजीबुल रेहमान मनिहार (18, रा. विद्यानगर, चिंचवड) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी चेतन सूर्यकांत पात्रे (21, रा. विद्यानगर, चिंचवड), करण दोढे (18, रा. विद्यानगर, चिंचवड) आणि लक्ष्या कांबळे (18, रा. विद्यानगर, चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून, करण दोढे याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मनिहार आपल्या काकांसाठी औषध घेऊन घरी जात असताना आरोपींनी त्यांना अडवून दारूसाठी पैशांची मागणी केली.
पैसे देण्यास नकार दिल्याने लक्ष्या कांबळे याने फिर्यादीच्या कानशिलात मारली आणि सिमेंटचा गट्टू पायावर मारून जखमी केले. इतर आरोपींनीही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकाराबाबत फिर्यादीच्या नातेवाईकांनी जाब विचारला असता, आरोपींनी फिर्यादीचे काका आणि चुलत भावांनाही मारहाण केली आणि पुन्हा आल्यास ’मारून टाकू’ अशी धमकी दिली. पिंपरी पोलिस तपास करत आहेत.