पिंपरी: पुनावळे येथील ए. जे. फर्निचर मॉलवर झालेल्या गोळीबार प्रकरणात आता थरारक आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे. फर्निचर व्यावसायिकाकडून दोन कोटी रुपयांची खंडणी उकळण्यासाठी लॉरेन्स बिष्णोई गँगने अक्षरशः कॉर्पोरेट स्टाईल क्राइम ऑपरेशन उभे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सोशल मीडियावरून शार्पशूटर्सची भरती, सिग्नल ॲपवर गुप्त व्यवहार, चंदिगढमध्ये फायरिंग ट्रेनिंग, पुण्यात येऊन रेकी आणि त्यानंतर थेट गोळीबार असा संपूर्ण कट आखण्यात आला होता.
विशेष म्हणजे, या संपूर्ण कटाचा सूत्रधार सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील आरोपी कुलदीप ऊर्फ कशीष असल्याचे उघड झाले असून, त्याने जेलमधूनच आरोपींना हँडल केल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
या प्रकरणात आत्तापर्यंत परवीन रामनिवास (वय 22), पंकज कुलदीप (वय 21) आणि सागर अजयपाल (21, सर्व रा. सोनीपत, हरियाणा) या तिघांना गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकाने उत्तराखंडमधील हरिद्वार येथून अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना 28 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यात आरजू बिश्नोई, शुभम लोणकर आणि कुलदीप ऊर्फ कशीष याला अद्याप अटक करण्यात आली नाही.
इंस्टाग्रामच्या माध्यमातूनआरोपींशी साधला संपर्क
सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील आरोपी कशीष याने आरोपी परवीन रामनिवास याच्याशी सर्वप्रथम इंस्टाग््राामच्या माध्यमातून संपर्क साधला. बिष्णोई गँगसाठी काम करणार का?, असा प्रस्ताव कशीष याने दिला होता. सर्व आरोपी तयार झाल्यानंतर त्यांना सिग्नल ॲप डाउनलोड करण्यास सांगण्यात आले. पुढील सर्व संवाद या एनक्रिप्टेड ॲपवरूनच झाला. याच माध्यमातून फर्निचर व्यावसायिकावर गोळीबार करण्यासाठी अडीच लाख रुपयांची सुपारी निश्चित करण्यात आली.
खंडणी न दिल्याने गोळीबार
15 मे रोजी रात्री नऊच्या सुमारास जगदीश भेराराम बिष्णोई हे पुनावळे येथील फर्निचर मॉलसमोर बसले असताना दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी जवळून पाच ते सहा राऊंड गोळीबार केला. सुदैवाने ते या हल्ल्यातून बचावले. या घटनेनंतर शहरातील व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
तपासात आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. गोळीबार करण्यापूर्वी व्यावसायिक जगदीश बिष्णोई आणि त्यांचे भागीदार अशोक कुमार बिष्णोई यांना परदेशी क्रमांकावरून व्हॉट्सॲप कॉल करण्यात आले होते. दोन कोटी रुपयांची खंडणी मागत पैसे नाही दिले तर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी देण्यात आली होती. मात्र, व्यावसायिकांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. त्यानंतरच गोळीबाराचा निर्णय घेण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
खासगी ट्रॅव्हल्सने आरोपी पुण्यात
त्यानंतर बिष्णोई टोळीचा सदस्य आरजू बिष्णोई याने हस्तकांमार्फत आरोपींना दोन पिस्तुले, 23 जिवंत काडतुसे, पैसे आणि वाहने उपलब्ध करून दिली. दरम्यान, चंदिगढमध्ये आरोपींना पिस्तूल चालविण्याचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर सोनीपत येथे प्रत्यक्ष गोळीबाराचा सराव करण्यात आला. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आरोपी 14 मे रोजी खासगी ट्रॅव्हल्सने पुण्यात दाखल झाले. पुण्यातील एका लॉजमध्ये मुक्काम करून त्यांनी ए. जे. फर्निचर मॉलची रेकी केली. व्यावसायिकाच्या हालचाली, बसण्याची जागा, येण्या-जाण्याची वेळ याची माहिती गोळा करण्यात आली.
लॉजमधून मिळाली तपासाला दिशा
या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तब्बल सात पथके तयार केली होती. पोलिसांनी 350 ते 400 सीसीटीव्ही फुटेज तपासले. आरोपी पुण्यात ज्या लॉजमध्ये थांबले होते, तेथून रावेत पोलिस ठाण्यातील अंमलदार सौदागर लामतुरे, प्रदीप गायकवाड यांना महत्त्वाचे धागेदोरे मिळाले.
तांत्रिक विश्लेषणातून आरोपी हरियाणातील असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर गुंडाविरोधी पथकाने सहायक निरीक्षक हरीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली रोहतकमध्ये सलग चार दिवस शोधमोहीम राबवली. आरोपी हरिद्वारमध्ये लपल्याची माहिती मिळताच गुंडाविरोधी पथकाने जीवाची पर्वा न करता एका लॉजमध्ये फिल्मी स्टाईल धाड टाकून तिघांच्या मुसक्या आवळल्या.
बिष्णोई गँगचे ‘एक्स्टॉर्शन मॉड्यूल’ सक्रिय
या प्रकरणात शुभम लोणकर याचाही सहभाग समोर येत असून, महाराष्ट्रात बिष्णोई गँगचे एक्स्टॉर्शन मॉड्यूल सक्रिय असल्याचा संशय पोलिसांना आहे. पुण्यातील गोल्डमॅन सनी वाघचौरे, दिघीतील व्यापारी तसेच संत तुकारामनगर परिसरातील खंडणी प्रकरणांशी या आरोपींचा संबंध आहे का, याचाही तपास सुरू आहे. पोलिस आता आरोपींच्या बँक व्यवहारांचा, सोशल मीडिया नेटवर्कचा आणि जेलमधून झालेले संपर्क याचा तपास सुरू आहे.
इंस्टाग्रामवर भरती, सिग्नल ॲपवर सुपारी
बिष्णोई गँगने पारंपरिक गुन्हेगारी पद्धतीऐवजी सोशल मीडिया आणि एनक्रिप्टेड ॲपचा वापर करून शार्पशूटर्स भरती केल्याचे समोर आले आहे. इंस्टाग््राामवर संपर्क, सिग्नल ॲपवर संवाद आणि ऑनलाइन पैशांची देवाणघेवाण असा संपूर्ण डिजिटल नेटवर्क वापरण्यात आल्याचे समोर आले आहे.
जेलमध्ये बसून गुन्हेगारी नेटवर्कला निर्देश
सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील आरोपी कुलदीप ऊर्फ कशीष हा तुरुंगात असतानाही बाहेरच्या गुन्हेगारी नेटवर्कला निर्देश देत असल्याचे या तपासातून उघड झाले. त्यामुळे जेलमधून ऑपरेट होणाऱ्या गँग नेटवर्कबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पिंपरी-चिंचवड पोलिस लवकरच कुलदीप ऊर्फ कशीष याला या गुन्ह्यात वर्ग करून घेणार आहेत.
पुण्यात व्यापाऱ्यांच्या टार्गेट लिस्ट ?
रावेत गोळीबारानंतर पुण्यातील काही व्यापाऱ्यांना पूर्वी मिळालेल्या धमक्या पुन्हा चर्चेत आल्या आहेत. गोल्डमॅन सनी वाघचौरे, दिघीतील व्यापारी आणि इतर खंडणी प्रकरणांशी या आरोपींचा संबंध आहे का, याचा तपास गुन्हे शाखा करत आहे.
आरोपींच्या बँक खात्यावर 50 हजार
गोळीबारासाठी ठरलेल्या अडीच लाखांच्या सुपारीपैकी 50 हजार रुपये आरोपी सागर अजयपालच्या बँक खात्यावर ट्रान्सफर करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या व्यवहारातून पोलिसांना महत्त्वाचा आर्थिक पुरावा मिळाला आहे.