Vasudev Folk Artist Pudhari
पिंपरी चिंचवड

Maharashtra Vasudev Folk Artist: खराळवाडीत वासुदेव लोककलेचे दुर्मिळ दर्शन

बदलत्या युगात नामशेष होत चाललेली परंपरा; तुकारामाच्या नामगजरातून भक्तीचा वसा जपणारा वासुदेव

पुढारी वृत्तसेवा

खराळवाडी: टिल्लम टिल्लम ताल वाजतो, मुखी हरिचे नाम गर्जतो, टिल्लम टिल्लम प्रभातकाली थय थय करीत स्वारी आली... असे म्हणत पहाटे तांबडं फुटता दारात उभा राहून सर्वांना झोपेतून जागवणारे वासुदेव बदलत्या युगात नामशेष होत चालले आहेत. अशातच सकाळच्या वेळेला तुकानामाचा गजर करीत भक्तिभावाच्या गजरामधून भक्तीचा परामर्थाचा वसा जपणाऱ्या वासुदेवाचे दर्शन खराळवाडी येथील नागरिकांना होत आहे.

प्रकाश पवार हे वासुदेव लोककलावंत आहेत. त्यांनी सांगितले की, वासुदेव लोककलावंत दुर्मिळ झाल्याने समाजातील पारंपरिक व आध्यात्मिक व्यक्तिमत्त्व हरवल्यासारखे जाणवत आहे. मराठी मुलखात वासुदेव हा शहरात सकाळच्या वेळी विठ्ठलाचे अभंग व गवळण गात दान मागणारा लोककलावंत आहे. मराठी संस्कृतीतील वासुदेवांची परंपरा सुमारे एक हजार ते बाराशे वर्षे जुनी आहे. पूर्वी अंगणात वासुदेव आला म्हणजे सौभाग्याची गोष्ट मानली जात असे. कारण वासुदेवाच्या रूपाने श्रीकृष्ण घरी आल्याचा आनंद त्या कुटुंबीयांना होत होता.

त्याचे दर्शन घडले की लहान मुले आनंदाने नाचत होते. घरातील महिला सुपातून तांदूळ किंवा धान्य दान करत होत्या. पुरुष मंडळी दक्षिणा देऊन त्यांचा आशीर्वाद घेत होते. वासुदेवही भक्तिभावाचे गाणी गाऊन अंगणात नाच करी. त्यामुळे सारे अंगण समाधानाने फुलून जात होते. हल्लीच्या काळात हा वासुदेव दिसेनासा होत आहे; परंतु खराळवाडी, गांधीनगर परिसरात वासुदेवाचे आगमन झाले असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

मयूरपंखी टोपीचे आकर्षण

डोक्यावर मोरपंखाची टोपी, पायघोळ अंगरखा, धोतर, कमरेभोवती शेला किंवा उपरणे गुंडाळलेली व्यक्ती असे वासुदेवाचे चित्र डोळ्यासमोर येते. एका हातात टाळ अथवा चिपळ्या, कमरेला पावा, मंजिरी अशी वाद्ये आणि काखेला झोळी, गळ्यात कवड्यांच्या व रंगीबेरंगी मण्यांच्या माळा, हातात तांब्याचे कडे, कपाळावर व कंठावर गंधाचे टिळे असा वासुदेवाचा वेश असतो; परंतु सध्याच्या काळात वासुदेव नामशेष होत असल्याचे दिसत आहे.

लोककला महाराष्ट्राचा आत्मा आहे, परंतु गगनचुंबी इमारतींच्या उच्च सोसायटीत पांगुळ, नंदिवाले, डोंबारी, गारुडी, वासुदेव यांना प्रवेश नाकारल्याने लोककलावंताची लोककला लोप पावत चालली आहे. मला दान दिले, नाही दिले तरी मी खराळवाडी, गांधीनगर परिसरात गेल्या चार वर्षांपासून जावून लोककला जपत आहे.
प्रकाश पवार, वासुदेव कलावंत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT