पिंपळे गुरव: कासारवाडी रेल्वे स्टेशन परिसरातील कचरा संकलन केंद्रासमोरील मुख्य रस्त्याच्या मधोमध असलेले चेंबर खचल्याने वाहनचालकांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या धोकादायक चेंबरकडे वाहनचालकांचे लक्ष जावे म्हणून नागरिकांनी तात्पुरत्या स्वरूपात झाडांच्या फांद्या उभ्या करून त्याला रिबीन गुंडाळली आहे. परंतु, शहरातील विविध भागातील रस्त्यांमध्ये असलेल्या चेंबरची झाकणे वारंवार तुटत असल्याने प्रशासनाने केलेल्या कामावर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. महापालिका प्रशासनाने येथील चेंबर त्वरित दुरुस्त करावा, अशी मागणी होत आहे.
कासारवाडी रेल्वे स्टेशन हा परिसर अत्यंत गजबजलेला असून, दिवसभर मोठ्या प्रमाणात येथे वाहनांची रहदारी असते. कचरा संकलन केंद्रामध्ये कचरा वाहून नेणाऱ्या गाड्यांची सतत वर्दळ असते. त्याचबरोबर दुचाकी, चारचाकी आणि पादचाऱ्यांची मोठी ये-जा या मार्गावर असते. अशा ठिकाणी रस्त्याच्या मधोमध चेंबर खचलेले असणे म्हणजे अपघाताला खुले आमंत्रणच आहे.
विशेष म्हणजे काही दिवसांपासून हे चेंबर खचलेले व धोकादायक स्थितीत असल्याची माहिती असूनही प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. वाहन चेंबरमध्ये पडून गंभीर अपघात होऊ नये, यासाठी स्थानिक नागरिकांनीच पुढाकार घेत झाडांच्या फांद्या उभ्या करून तात्पुरती खबरदारी घेतली आहे. ज्या कामासाठी प्रशासन ठेकेदार आणि संबंधित विभाग जबाबदार आहेत ते काम नागरिकांनाच करावे लागत असल्याचे हे विदारक चित्र आहे.
एखादा मोठा अपघात घडल्यावरच प्रशासन जागे होणार का? असा संतप्त सवाल परिसरातील नागरिक उपस्थित करत आहेत. एखाद्याचा जीव गेल्यावर दोषारोप आणि चौकशी करण्यापेक्षा तत्काळ चेंबरची दुरुस्ती करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे. लवकरात लवकर हे चेंबर दुरुस्त न केल्यास प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे होणाऱ्या अपघातांची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
चेंबर खचलेल्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना तात्काळ पाठवून आवश्यक बॅरिकेट्स लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सदर चेंबरची दुरुस्ती करून नवीन चेंबर उद्या सकाळी तात्काळ बदलण्यात येईल.सतीश वाघमारे, कार्यकारी अभियंता, स्थापत्य विभाग
हा रस्ता दिवसभर गजबजलेला असतो. काही दिवसांपासून चेंबर खचलेले आहेत. प्रशासनाकडे तक्रार करूनही कुणी फिरकले नाही. अपघात टाळण्यासाठी आम्हाला झाडांच्या फांद्या उभ्या कराव्या लागल्या ही शोकांतिका आहे.गणेश मोरे, स्थानिक नागरिक