पिंपरी: शहरातील नागरिकांना बस, मेट्रो, रेल्वे आदी सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध व्हावा, सुरक्षितपणे स्टेशन व थांब्यांपर्यत तसेच, रस्त्या ओलांडण्यासाठी महामेट्रोकडून कासारवाडीतील नाशिक फाटा चौकात फूट ओव्हर ब्रिज (पादचारी पूल) उभारण्यात येत आहे. मात्र, त्याचे काम कासव गतीने सुरू असल्याने सातत्याने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यात अपघात होण्याचा धोका वाढला आहे.
नाशिक फाटा चौकात निगडी ते दापोडी दुहेरी बीआरटी मार्ग आहे. भोसरी, चाकण ते पुणे अशी बस सेवा आहे. कासारवाडी रेल्वे स्टेशन आहे. पुणे-नाशिक महामार्ग असल्याने तेथील एसटी थांब्यावरून नाशिकला ये-जा करता येते.
मेट्रोचे नाशिक फाटा स्टेशन या चौकात आहे. जेआरडी टाटा दुमजली उड्डाण पुलावरून कासारवाडीहून भोसरीला जाता येते. तसेच, उड्डाण पुलावर नाशिक फाटा ते वाकड बीआरटी मार्ग आहे. त्यामुळे या चौकातून दररोज हजारो नागरिक ये-जा करतात. चौकात पादचारी व प्रवाशांना रस्ता ओलांडण्यासाठी तसेच, स्टेशन व थांब्यांवर ये-जा करण्यासाठी सुरक्षित असा स्वतंत्र मार्ग नाही.
त्यामुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून ये-जा करावी लागते. त्यात अपघात होण्याचा धोका अधिक आहे. त्या ठिकाणी महामेट्रोकडून पादचारी पूल उभारण्यात येत आहे. वायएफसी-बीबीजी जेव्ही या ठेकेदाराकडून 1 जून 2025 पासून कामास सुरूवात केली आहे. त्यासाठी 20 कोटी 89 लाख रूपये खर्च अपेक्षित आहे. काम संथ गतीने सुरू आहे.
कामासाठी दररोज रात्री ग्रेडसेपरेटर तसेच, सर्व्हिस रस्ता बंद केला जात असल्याने मोठी वाहतूक कोंडी होते. त्यातून अपघात होण्याचा धोका वाढला आहे. ते काम वेगात पूर्ण करण्याची मागणी त्रस्त वाहनचालकांसह पादचार्यांकडून केली जात आहे.