Kamshet PMPML Bus Stop Issue Pudhari
पिंपरी चिंचवड

Kamshet PMPML Bus Stop Issue: कामशेतमध्ये पीएमपीएमएल बस थांब्यावर निवाराशेडचा अभाव; प्रवाशांचे हाल

40 अंश तापमानात बसची वाट पाहावी लागत असल्याने नागरिक संतप्त; तातडीने सुविधा देण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

कामशेत: पुणे महानगर परिवहन मंडळाची बससेवा अनेक वर्षांपासून कामशेत शहरात सुरू असून, निगडी ते लोणावळादरम्यान या बसची नागरिकांना सुविधा उपलब्ध आहे; परंतु अद्याप कामशेत येथील पीएमपी बस थांब्यावर निवाराशेड नसल्याने उन्हाळ्यात प्रवाशांचे हाल होत आहेत. यामुळे स्थानिक नागरिक व प्रवासी यांच्यात असंतोषाचे वातावरण आहे.

मागील काही दिवस कामशेत शहरात भयंकर उष्णता वाढली आहे. पारा 40 अंशांवर गेल्याने नागरिक उकाड्याने हैराण आहेत. अशातच बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्यादेखील जास्त असल्याने प्रवाशांना अशा भर उन्हामध्ये रस्त्यावर उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागत आहे. पुणे-लोणावळा लोकल ह्या दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत प्रवाशांना उपलब्ध नसल्याने पर्यायी मार्ग हा बसचा असल्याने कामशेतकर नागरिक व प्रवासी हे पीएमपीएमएल बसचा आधार घेत आहेत. अशा रखरखत्या उन्हात वयस्कर नागरिक, महिला, मुले बसची वाट पाहत उभे असल्याचे चित्र सध्या कामशेतमध्ये पहावयास मिळत आहे.

पीएमपीएमएल प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. पीएमपीला या मार्गातून उत्पन्न मिळत आहे तर प्रवाशांची सोयीसुविधांकडे त्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. बस थांब्यावर निवाराशेड नसल्याने उन्हाळा, पावसाळा व हिवाळ्यातदेखील प्रवाशांचे हाल होत आहेत. उन्हापासून व येणाऱ्या पावसाळ्यात पाण्यापासून बचाव होण्याकरिता निवारा शेड ही काळाची गरज असल्याने कामशेत बस थांब्यावर निवारा शेड हे त्वरित होणे गरजेचे आहे.

पीएमपी थांबेना बस स्टॉपवर

चालक व वाहक हे प्रवाशांना जाणीवपूर्वक त्रास देत असून, बस ज्या ठिकाणी प्रवासी थांबलते त्या ठिकाणी न थांबवता मागे किंवा पुढे काही अंतरावर थांबवतात. त्यामुळे प्रवाशांची धांदल उडते व एकच धावपळ होते. त्यात काही महिला प्रवासी ह्या पळता पळता रस्त्यावर पडल्याच्या घटनादेखील घडल्या आहेत.बस चे दरवाजे हे स्वयंचलित असल्याने चालक अर्धे प्रवासी खालीच सोडून दरवाजे बंद करून घेतात त्यामुळे प्रवाशांना पुन्हा अर्धा पाऊणतास ताटकळत उभे रहावे लागते.

मी माझ्या कार्यकाळात उपसरपंच असताना ग््राामपंचायत खडकाळाचे ग््राामसेवक व सरपंच यांच्याकडे मासिक सभेत सदरचा विषय मांडून बस प्रवाशांकरिता निवाराशेड बांधण्याची मागणी केली होती. 15 व्या वित्त आयोगाच्या फंडामार्फत निधीला मंजुरी देखील मिळाली असताना केवळ टक्केवारीचा विषय न झाल्याने सदर निवारा शेड अद्यापही झालेले नाही. सदर निवारा शेड उभारणी करीता रोडलगत असलेले जागा मालक छाजेड यांनीदेखील जागा देण्याचे कबूल केले होते; परंतु आजही प्रवासी हाल अपेष्टा सहण करीत तापत्या उन्हात बसची प्रतीक्षा करीत आहेत. ही या जनतेची खूप मोठी शोकांतिका आहे.
दत्तात्रय शिंदे, मा. उपसरपंच, खडकाळा ग््रुाप ग््राामपंचायत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT