जिजाऊ क्लिनिक pudhari
पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड शहरात 70 ठिकाणी जिजाऊ क्लिनिक

कॅन्सर, बर्न, ट्रॉमा युनिट, डायलिसिस विभागही करणार सुरू; माफक दरात रुग्णसेवेचा संकल्प

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी : शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असताना, रुग्णांना वैद्यकीय सेवासुविधा उत्तम दर्जाच्या मिळाव्यात, म्हणून वैद्यकीय विभागाकडून विविध प्रकारची रुग्णालये आणि विभाग सुरू करण्यात येत आहेत. महापालिकेच्या सन 2025-26 च्या अर्थसंकल्पात वैद्यकीय सुविधांच्या सक्षमीकरणासाठी भरघोस तरतूद केली आहे. यामुळे 100 बेडचे कॅन्सर रुग्णालय, 30 बेडचे बर्न रुग्णालय, ट्रामा युनिट, डायलिसिस युनिट, प्लास्टिक सर्जरी विभाग, 250 बेडचे प्रसूती व बालरोग रुग्णालय उभारण्यास मोठी तरतूद केली आहे. तर शहरात 70 ठिकाणी शहरी आरोग्य केंद्र (जिजाऊ क्लिनिक) सुरू करण्यात येत आहेत.

वाढलेली महागाई, त्यात वैद्यकीय औषधोपचार व खर्च सर्वसामान्य रुग्णांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. शहरात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहरी भागातील सर्वसामान्यापासून मध्यमवर्गीय तसेच, गरजू नागरिक महापालिका रुग्णालयात उपचार घेत आहेत.

वैद्यकीय विभागाकडून नागरिकांना वैद्यकीय सुविधा पुरविण्यासाठी शहराच्या विविध भागांमध्ये 8 मोठी रुग्णालये, 27 दवाखाने, 20 आरोग्य केंद्र, 8 कुटुंब नियोजन केंद्र, 36 लसीकरण केंद्र आहेत. यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालय हे 750 बेड क्षमतेचे सर्वांत मोठे रुग्णालय आहे. 400 बेडचे नवीन थेरगाव रुग्णालय, 100 बेडचे नवीन भोसरी रुग्णालय, 130 बेडचे नवीन आकुर्डी रुग्णालय आणि 120 बेडचे नवीन जिजामाता रुग्णालयांसह एक हजार 589 बेडची व्यवस्था महापालिकेच्या इतर रुग्णालयांत आहेत.

चिंचवड येथील नव्याने सुरू झालेल्या तालेरा अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. रुग्णालयात 250 बेडचे प्रसुतीकक्ष व बालरोग रुग्णालय सुरू होत आहे. या रुग्णालयात युरोलॉजी व प्लास्टिक सर्जरीसाठी विभाग सुरू करण्यात येणार आहे. महापालिकेच्या चार नवीन रुग्णालयांमध्ये डायलेसिस युनिट सुरु केले जाणार आहे. नवीन थेरगाव रुग्णालयात ट्रामा युनिट सुरु करण्यात येणार आहे. रूग्णालय व दवाखाने जवळ नसलेल्या भागांत एकूण 70 शहरी आरोग्य केंद्र सुरु करण्यात येत आहेत. मोशी येथे 700 बेडचे मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाची इमारती उभी करण्याचे काम सुरू आहे.

सर्व रुग्णालयांमध्ये हॉस्पिटल मॅनेजमेन्ट इन्फोर्मेशन सिस्टिम सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे उपचार घेतलेल्या रुग्णांची माहिती एकत्रित उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शहरातील कोणत्याही रुग्णालयात उपचार मिळतील.

दोन रुग्णालयांत वैद्यकीय अभ्यासक्रम

नवीन थेरगाव आणि नवीन भोसरी रुग्णालयात डीएनबीसाठी पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. तेथे विद्यार्थ्यांना स्त्रीरोग, बालरोग आणि भूलशास्त्र विषयांचे प्रशिक्षण दिले जात आहे. या रुग्णालयांमध्ये औषध, कान, नाक घसा शस्त्रक्रिया, आर्थोपेडिक्स अभ्यासक्रमांसाठी परवानगी घेण्याची प्रक्रिया सुरु आहे. आकुर्डी, नवीन जिजामाता, नवीन तालेरा रुग्णालयात स्त्रीरोग, बालरोग, भूलशास्त्र, औषधे, ईएनटी शस्त्रक्रिया, आर्थोपेडिक्स आदी डीएनबी अभ्यासक्रम सुरु करण्याची प्रक्रिया प्रस्तावित आहे.

कॅन्सर रुग्णालयाचे काम महिन्याभरात सुरू करणार

नवीन थेरगाव रुग्णालयाशेजारी 100 बेडचे कॅन्सर (कर्करोग) रुग्णालय सुरु करण्यात येणार आहे. सार्वजनिक खासगी भागीदारीवर (पीपीपी) तत्वावर ते रूग्णालय असणार आहे. तेथे रूग्णांना माफक दरात उपचार उपलब्ध होतील. महिन्याभरात त्या इमारतीचे काम सुरू करण्याचे नियोजन आहे. जुन्या तालेरा रुग्णालयात 30 खाटांचे बर्न (जळीत) रुग्णालय सुरु करण्यात येत आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आहेत. तेथे प्लास्टिक सर्जरीसाठी स्वंतंत्र विभाग सुरु करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT