गोळीबाराचा किचकट गुन्हा उघड Pudhari
पिंपरी चिंचवड

Crime News : चुलत भावानेच दिली 12 लाख रुपयांची सुपारी

गुंडा विरोधी पथकाकडून औद्योगिक क्षेत्रातील गोळीबाराचा किचकट गुन्हा उघड

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी : चाकण औद्योगिक क्षेत्रात स्टील व्यवसायाच्या मॅनेजरवर गोळीबार झाल्याच्या घटनेने उद्योग जगतात खळबळ उडाली होती. 20 जानेवारी रोजी घडलेला हा गुन्हा उद्योग क्षेत्रातील कंत्राटांमधील स्पर्धेतून झाला असल्याची चर्चा काही ठिकाणी रंगली होती. मात्र, पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाने या गुन्ह्याचा छडा लावून हा हल्ला व्यावसायिक स्पर्धेमुळे नव्हे, तर कौटुंबिक वैमनस्यातून घडल्याचे उघड केले. चुलत भावानेच 12 लाखांची सुपारी देऊन मॅनेजरला ठार मारण्याचा कट रचल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

अजय विक्रम सिंग (35, रा. हिंजवडी, पुणे), असे जखमी मॅनेजरचे नाव आहे. पोलिसांनी गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार अजय सिंग यांचा चुलत भाऊ संग्राम ऊर्फ चंदन अनंत सिंग (42, रा. मारुंजी, पुणे) याच्यासह रोहित पांडे (23, रा. उत्तर प्रदेश) यास अटक केली आहे. या प्रकरणात एकूण पाच जणांचा सहभाग असल्याचे समोर आले असून, त्यातील दोन आरोपींना मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमधून अटक करण्यात आली आहे. गुंडा विरोधी पथकाने अतिशय किचकट तपास करून हा गुन्हा उघडकीस आणला.

जखमी मॅनेजरलाही धक्का

या गुन्ह्याचा समांतर तपास गुंडा विरोधी पथकाने हाती घेतला. तांत्रिक विश्लेषण आणि प्राथमिक तपासादरम्यान अजय सिंग यांचा चुलत भाऊ संग्राम सिंग याच्यावर संशय आला. मात्र, जखमी अजय सिंग यांनी त्याच्या पोलिसांच्या तपासावर सुरुवातीला विश्वास ठेवला नव्हता. मात्र, तरीही पोलिसांनी तपास सुरूच ठेवला आणि संग्राम सिंग हा मध्य प्रदेशातील एका रेल्वे स्थानकावर असल्याचे गुप्त माहितीवरून समजले. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. सत्या समोर आल्यानंतर जखमी मॅनेजरलाही मोठा धक्का बसला.

वादाला व्यावसायिक वादाची किनार

जखमी अजय सिंग आणि आरोपी संग्राम सिंग हे चुलत भाऊ आहेत. पूर्वी ते एकत्र स्टील व्यवसाय करत होते. मात्र, संग्रामला आर्थिक नुकसान झाले, तर अजय यांचा व्यवसाय यशस्वी ठरला. अजय यांनी संग्राम याला अनेकदा मदत केली; परंतु एका मोठ्या व्यवहारात संग्रामने ठरल्याप्रमाणे व्यवहार केला नाही. यामुळे अजय यांना वरिष्ठांकडून जाब विचारला गेला. ही बाब संग्रामच्या जिव्हारी लागली. तो राग मनात होता. त्यातूनच त्याने उत्तर प्रदेशातील चार सराईत गुन्हेगारांना 12 लाख रुपयांची सुपारी देऊन अजयला संपवण्याचा कट रचला.

आरोपींनी 11 दिवस ठेवली पाळत

उत्तर प्रदेशातील चार आरोपी महाळुंगे परिसरात आले. त्यांनी येथे एक खोली भाड्याने घेतली आणि 11 दिवस अजय सिंग यांच्यावर पाळत ठेवली. आरोपींनी नाना पेठ येथून 70 हजार रुपयांना दुचाकी खरेदी केली. त्याच दुचाकीवरून 2 जानेवारी रोजी कैलास स्टील कंपनीच्या आवारात येऊन गोळीबार केला. आरोपींनी हडपसरमध्ये दुचाकी ठेवली आणि विशाखापट्टणममार्गे उत्तर प्रदेशला पळ काढला.

गुन्हेगारांचा माग कसा काढला?

गुंडा विरोधी पथकाने महाळुंगे परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने आरोपींची ओळख पटवली. संग्राम हा जखमी भावाला भेटण्यासाठी रुग्णालयातही गेला होता. त्याने पोलिसांना संशय येऊ न देता भेट घेतली आणि त्यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवले. मात्र, पोलिसांनी तपास सुरूच ठेवला आणि त्याला मध्य प्रदेश येथून अटक केली. त्याच्या एका साथीदारालाही उत्तर प्रदेशमध्ये अटक करण्यात आली आहे.

गोळीबाराचे वरिष्ठ पातळीवर पडसाद

औद्योगिक पट्ट्यात झालेल्या या थरारक हल्ल्याचे पोलिस खात्याच्या वरिष्ठ स्तरावर पडसाद उमटले होते. काही जणांनी हा उद्योगातील स्पर्धेतून घडलेला हल्ला असल्याचा दावा केला होता. मात्र, तपासानंतर हा पूर्णपणे कौटुंबिक वादातून झाल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे, मुख्यमंत्र्यांनी नुकतेच उद्योगांना पोषक वातावरण निर्माण करण्याचे आश्वासन दिल्याने या गुन्ह्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

...अशी घडली घटना

महाळुंगे येथील कैलास स्टील कंपनीच्या आवारात दुचाकीवरून आलेल्या दोघांनी मॅनेजर अजय सिंग यांच्यावर थेट गोळीबार केला. त्यांना दोन गोळ्या लागल्या. महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT