पिंपरी : हिंजवडी आयटी पार्कमधील इन्फोसिस कंपनीत बुधवारी (दि. ६) दुपारच्या सुमारास राष्ट्रीय सुरक्षा रक्षक दल (एनएसजी) कमांडो, गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांच्या पथकांनी अचानक धडक दिली. अचानक वाढलेल्या या बंदोबस्तामुळे परिसरात काही वेळ अतिरेकी हल्ला झाल्याची चर्चा सुरू झाली. अनेक आयटी कर्मचाऱ्यांनी घाबरून सोशल मीडियावर पोस्ट केल्यामुळे अफवांना अधिक उधाण आले. मात्र, ही घटना केवळ मॉकड्रिल होती, असे स्पष्टीकरण पोलिसांनी दिल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. (Pcmc Latest News)
याबाबत सविस्तर वृत्त असे की, आज दुपारी इन्फोसिस कंपनीच्या मुख्य गेटवर अचानक एनएसजी कमांडो, पोलिस आणि गुन्हे शाखेचे अधिकारी सुसज्ज वाहनांसह दाखल झाले. काही जवानांनी परिसराची वेढा घालून झडती सुरू केली. कमांडो हत्यारांसह तैनात असल्याचे दृश्य पाहून उपस्थित आयटी कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.
या कारवाईची बातमी काही मिनिटात वाऱ्यासारखी शहरभर पसरली. अनेकांनी ‘ अतिरेकी हल्ला झाला का?’ असा प्रश्न विचारत सोशल मीडियावर पोस्ट टाकण्यास सुरुवात केली. काही पालकांनी कंपनीच्या संपर्क क्रमांकांवर फोन सुरू केले. या सगळ्या गोंधळामुळे इन्फोसिसच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ गोंधळ निर्माण झाल्याचे पहावयास मिळाले.
“इन्फोसिस परिसरात आज सुरू असलेली कारवाई नियोजित ‘मॉकड्रिल’ होती. अशा सरावांद्वारे अतिरेकी हल्ल्यासारख्या आपत्कालीन प्रसंगांमध्ये पोलिस, सुरक्षा यंत्रणा आणि कंपनी व्यवस्थापन यांच्यातील समन्वय तपासला जातो. नागरिकांनी घाबरू नये. ही केवळ सुरक्षा चाचणी होती,”– विशाल गायकवाड, पोलिस उपायुक्त, पिंपरी- चिंचवड