पिंपरी: पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण भागातील सुमारे 50 लाख नागरिकांच्या आरोग्याशी निगडित असलेल्या आणि महाराष्ट्राच्या वारकरी सांप्रदायामध्ये श्रद्धास्थान असलेली इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला आता चालना मिळाली आहे.
राज्य सरकारच्या नगर विकास विभागाच्या राज्यस्तरीय तांत्रिक समितीच्या (एसएलटीसी) मान्यतेचा प्रस्तावाला अखेर मान्यता मिळाली. त्यामुळे नदी सुधार प्रकल्पाचे काम सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. (Latest Pimpari chinchwad News)
इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला चालना देण्यासाठी आणि पर्यावरणप्रेमी व स्वयंसेवी संस्था प्रकल्पाचा सुधारीत विकास आराखडा तयार करावा यासाठी आमदार महेश लांडगे यांनी पाठपुरावा केला होता. विधानसभा अधिवेशनामध्ये राज्य सरकारचे लक्ष वेधले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे 2022 मध्ये मागणी लावून धरली होती.
इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प अर्थात ‘नमामी इंद्रायणी’साठी सर्व प्रशासकीय व तांत्रिक मान्यता, निधीची उपलब्धता याबाबत सातत्त्याने केलेले पाठवायला अखेर यश मिळाले आहे. विशेष म्हणजे, शहर आणि परिसरातील पर्यावरणप्रेमी संस्था, संघटनांच्या प्रतिनिधींनी नदी सुधार प्रकल्पाचा विकास आराखडा अंतिम करताना महापालिकेच्या (मास्टर प्लान) मध्ये दर्शवल्यानुसार विविध ठिकाणी 60 एमएलडी क्षमतेचे मैलाशुद्धीकरण केंद्र या कामामध्ये प्रस्तावित केले आहेत, तसेच, बायोडायव्हर्सिटी पार्क इत्यादी कामांचा समावेश करण्यात आला आहे.
केंद्र शासन पुरस्कृत अमृत 2.0 अभियानांतर्गत अंतर्गत राज्यस्तरीय तांत्रिक समितीची अपर मुख्य सचिव, (नवि-2) यांच्या अध्यक्षतेखाली या प्रकल्पांच्या अनुषंगाने बैठक झाली. बैठकीत इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाचा सविस्तर विकास आराखड्याला तांत्रिक समितीची मान्यता मिळाली आहे.
राज्यातील वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान आणि पिंपरी-चिंचवडकरांची जीवनवाहिनी असलेल्या इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यस्तरीय तांत्रिक समितीची मान्यता मिळाली. यापूर्वी प्रशासकीय मान्यता देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकार्य केले. भाजप महायुतीच्या सरकारने पिंपरी-चिंचवडकरांना दिलेल्या शब्द खरा केला. मुख्यमंत्री फडणवीस आणि सरकारचे आभार व्यक्त करतो. आता प्रशासनाने पर्यावरणविषयक विविध बाबींची पूर्तता करावी आणि नदी सुधार प्रकल्पाच्या कामाला सुरुवात करावी अशी अपेक्षा आहे.- महेश लांडगे, आमदार