मिलिंद कांबळे
पिंपरी: नित्याची वाहतूक कोंडी, रस्त्यांवरील खड्डे, जोरदार पाऊस, बीआरटी मार्गावर बसफेर्यांची अपुरी संख्या, रस्त्यात बंद पडणार्या बस आदी कारणामुंळे नागरिक मेट्रोने प्रवास करण्यास पसंती देत आहेत.
पिंपरी ते स्वारगेट मार्गावर दररोज तब्बल 80 हजारांपेक्षा अधिक प्रवासी मेट्रोने जलद व सुरक्षितपणे ये-जा करीत आहेत. दिवसेंदिवस मेट्रोची प्रवासीसंख्या वाढत असल्याचे सकारात्मक चित्र पाहावायस मिळत आहे. (Latest Pimpri News)
पिंपरी-चिंचवड शहरात पिंपरी, संत तुकाराम नगर, नाशिक फाटा, कासारवाडी, फुगेवाडी आणि दापोडी हे सहा मेट्रो स्टेशन आहेत. या मार्गावरून पुण्यातील स्वारगेट तसेच, वनाज आणि रामवाडीपर्यंत मेट्रो मार्गावरून इच्छितस्थळी सहज ये-जा करता येते.
जोरदार पाऊस, खड्डेमय रस्ते व चिखल, नेहमीच होणारी वाहतूक कोंडी, प्रदूषणात वाढ, भरमसाट सिग्नलमुळे अडथळ्याची शर्यत, पीएमपी बसची अपुरी संख्या आदी कारणांमुळे नागरिक वैतागले आहेत. त्यामुळे स्वत:चे वाहन वापरण्यापेक्षा तसेच, बसने प्रवास करण्यापेक्षा मेट्रोचा पर्याय निवडला जात आहे.
पुण्यातील बहुतांश प्रमुख ठिकाणी मेट्रोने सहज जाता येत असल्याने, फेर्यांची संख्या मोठी असल्याने तसेच, तिकीटही जास्त नसल्याने मेट्रोला नागरिकांची पसंती वाढत आहे. विद्यार्थी, कामगार, नोकरदार, व्यावसायिक, अधिकारी, महिला आणि नागरिक मेट्रोला पसंती देत आहेत.
शनिवारी, रविवारी तिकीट दर कमीमुळे आणखी प्रतिसाद
प्रवाशांना शनिवारी व रविवारी तिकीट दर निम्मे असते. कमी खर्चात प्रवास करता येत असल्याने त्या दिवशी नागरिकांचा प्रतिसाद आणखी वाढतो. प्रवासी संख्येच्या आकडेवारीनुसार या दोन दिवसांत प्रवासी संख्या नेहमीच्या तुलनेत अधिक असल्याचे दिसून येत आहे. शनिवारी व रविवारी नागरिकांची संख्या 82 हजारांच्या पुढे पोहचत आहे.
प्रत्येक सहा मिनिटास मेट्रो उपलब्ध
रस्त्यावरून वाहतूक करण्यास मर्यादा येतात. खासगी वाहन वापरल्याने अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे अनेक नागरिक मेट्रोकडे वळले आहेत. प्रवासांची वाढती संख्या लक्षात घेऊन 7 मिनिटाऐवजी आता 6 मिनिटानंतर मेट्रोची फेरी सुरू केली आहे. त्यामुळे मेट्रो लगेच उपलब्ध होते. तसेच, अतिरिक्त मनुष्यबळही वाढविले आहे. रात्री अकरापर्यंत मेट्रोने प्रवास करता येतो, असे महामेट्रोचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत सोनवणेयांनी सांगितले.
दीड वर्षात निगडीहून करता येणार प्रवास
पिंपरी ते निगडी या 4.5 किलोमीटर अंतराच्या विस्तारीत मेट्रो मार्गाचे काम वेगात सुरू आहे. ते काम दीड वर्षांत पूर्ण होऊन तो वाहतुकीस खुला करण्याचे नियोजन आहे. त्यानंतर निगडीच्या भक्ती-शक्ती समूह शिल्प चौकापासून नागरिकांना मेट्रोने प्रवास करता येणार आहे. तसेच, टिळक चौक, आकुर्डी, चिंचवड स्टेशन येथूनही मेट्रोने ये-जा करता येईल. त्यामुळे शहरातील अनेक भाग मेट्रोशी जोडले जाणार आहेत. परिणामी, प्रवासी संख्या दुप्पटीपेक्षा अधिकने वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
प्रवासीसंख्या दुपटीवर
पिंपरी ते स्वारगेट अशी थेट मेट्रो प्रवासीसेवा वाहतूक 29 सप्टेंबर 2024 ला सुरू झाली आहे. त्या महिन्यात दररोज 40 हजार इतकी प्रवासी संख्या होती. त्यानंतर 50 हजार, 60 हजार अशी प्रवासी संख्या वाढत गेली आहे. सध्या त्यात दुपटीने वाढ झाली आहे.
मेट्रोने प्रवास करण्यास पसंती का ?
मेट्रोची जलद व सुरक्षित वाहतूक
पावसाने रस्ते जलमय
रस्ते खड्डेमय
नित्याची वाहतूक कोंडी
रस्ते मार्गावर अनेक ठिकाणी सिग्नल
बीआरटीएस मार्गावर बसफेर्याची संख्या कमी
बसगाड्यांमध्ये गर्दीचा त्रास
अस्वच्छ बसथांबे
ध्वनी, वायुप्रदूषणात वाढ
खासगी कंपन्यांच्या गाड्यांचे भरमसाट भाडे
वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था अपुरी
इंधनाचे वाढते दर