Egg Price Hike News: थंडी वाढल्यामुळे हॉटेल, ढाबे व अंडा भुर्जी व्यावसायिक या ठिकाणी अंड्याला प्रचंड प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे अंड्यांच्या बाजारभावात वाढ झाल्याने पोल्ट्री व्यवसाय करणार्यांना सुगीचे दिवस आले आहेत.
ऐन थंडीत अंड्यापासून ऊर्जा निर्मिती होत असून त्यातून प्रोटीन, कॅल्शियमची मात्रा मोठ्या प्रमाणात शरीराला मिळते. त्यामुळे थंडीच्या अगोदर अंड्याला शेकडा 650 बाजारभाव होता. परंतु थंडीत हा दर शेकडा 680 रुपयांपुढे गेला आहे. अंड्याची किरकोळ विक्री 8 रुपयेप्रमाणे 96 रुपये डझन अशी होत आहे.
अंड्यांचे बाजारभाव गेल्या महिनाभरापासून टिकून आहेत. जानेवारी, फेब्रुवारी महिन्यापर्यंत थंडी टिकून राहिल्यास अंड्यांचे दरही असेच टिकून राहण्याची दाट शक्यता असल्याचे चांडोली येथील अंडी उत्पादक पोल्ट्री व्यावसायिक ग्रामपंचायत सदस्य गोविंद थोरात, निकेतन दैने आणि उद्योजिका माया शंकर थोरात यांनी सांगितले.
गावोगावी यात्रा, उत्सव सुरू आहेत. त्यात सध्या थंडीमुळे अंडी, चिकन, मासे, मटणाला हॉटेल, ढाब्यांवर मोठी मागणी वाढल्याचे दिसून येत आहे. थंडीमुळे हॉटेलमध्ये मांसाहार करणार्यांची गर्दी होत असल्याचे हॉटेल व्यवसायिक नितीन भालेराव, सोमनाथ भालेराव, रवी भालेराव, विनोद भालेराव, तन्मय कानडे, तसेच एकलहरे येथील संतोष डोके, अर्जुन डोके, रामचंद्र गाडे यांनी सांगितले.