पिंपरी : सायबर गुन्हेगार फेसबुकपाठोपाठ आता व्हॉट्स अॅपही हॅक करून पैशांची मागणी करू लागले आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये दररोज दोन ते तीन जणांच्या व्हॉट्स अॅप हॅक झाल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर सायबर विभागाकडून व्हॉट्स अॅप वापरताना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सर्वसामान्य नागरिकांना गंडा घालण्यासाठी सायबर चोरटे दररोज नवनवीन आयडिया शोधून काढत आहेत.
फेसबुकवर बनावट खाते उघडून फ्रेंड लिस्टमधील सदस्यांना पैसे मागण्याचा सपाटा सुरू असताना चोरट्यांनी आता व्हॉट्स अॅप हॅक करून पैशांची मागणी करण्यास सुरुवात केली आहे. यासह तरुणींचे फोटो वापरून तयार केलेल्या बनावट खात्यावरूनही तरुणांना जाळ्यात ओढले जात आहे.
या वाढत्या प्रकारांमुळे अनेकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. हा मनस्ताप टाळण्यासाठी सायबर सेलने नागरिकांना काही सूचना दिल्या आहेत. या सूचनांचे पालन केल्यास फसवणूक टाळता येणे शक्य असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
फेसबुक फसवणुकीची 'मोडस ऑपरेंडी' फेसबुकवर सारख्या नावाचे खाते उघडून फ्रेंडलिस्टमधील सदस्यांना पैसे मागितले जातात. यामध्ये मोडस ऑपरेंडीमध्ये चोरटे फेसबुकवर बनावट खाते उघडतात.
खाते उघडताना संबंधिताचा प्रोफाइल फोटोदेखील वापरला जातो. खातेधारकाच्या सर्व मित्रांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून चोरटे मेसेंजरवर चॅट सुरू करतात. एकदा समोरच्याचा विश्वास बसला की अडचणीत असल्याचे सांगून पैशाची मागणी केली जाते. मित्र अडचणीत असल्याचे पाहून काहीजण थेट फोन करतात. मात्र, काहीजणांनी शहानिशा न करता ऑनलाईन पैसे पाठवतात.
फेसबुक, व्हॉट्स अॅप हॅकबावतच्या तक्रारी वाढल्या आहेत. या अॅपचा वापर करताना सर्वांनी खबरदारी घेण्याची गरज आहे. अज्ञात इसमांनी पाठवलेल्या फाईल, फोटो, लिंकवर क्लिक करू नये, अॅप वापरना आपला पिन कोड गोपनीय आणि मजबूत ठेवणे गरजेचे आहे. तसेच, अॅपमधील सुरक्षा पर्यायांचा जास्तीत जास्त वापर करावा. जेणेकरून तुमची माहिती अज्ञातांना मिळवणे शक्य होणार नाही.प्रवीण स्वामी, सहायक निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे