तापमानात चढ-उतार! शहरवासीयांना सर्दी, खोकला, ताप; बदलत्या वातावरणाचा आरोग्यावर परिणाम  File Photo
पिंपरी चिंचवड

Pimpri Weather Changes: तापमानात चढ-उतार! शहरवासीयांना सर्दी, खोकला, ताप; बदलत्या वातावरणाचा आरोग्यावर परिणाम

महापालिकेचे दवाखाने, रुग्णालये आणि खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी दिसत आहे.

पुढारी वृत्तसेवा

Impact of climate change on health

वर्षा कांबळे

पिंपरी: यंदा मे महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यानंतर सकाळी ढगाळ वातावरण, मध्येच कडक ऊन आणि पाऊस यामुळे सर्दी, खोकला, तापाने आजारी पडणार्‍यांचे प्रमाण वाढले आहे. महापालिकेचे दवाखाने, रुग्णालये आणि खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी दिसत आहे.

दवाखान्यात रुग्णांची गर्दी

दरवर्षी जून महिन्यामध्ये पावसाची वाट पाहवी लागते. काहीवेळेला जून कोरडाच जातो. यंदा मात्र, मे महिन्यापासूनच पावसाला सुरुवात झाली. सकाळी पाऊस व दुपारी कडक उन्ह या बदलत्या वातावरणामुळे संसर्गजन्य आजारांमध्ये वाढ झाली आहे. (Latest Pimpri News)

त्यामुळे शहरातील दवाखान्यात रुग्णांची गर्दी होत आहे. गेल्या काही दिवसांपासून कडाक्याचे ऊन पडते तर मधूनच कधी थंडी जाणवते, तर कधी वातावरण ढगाळ होऊन पाऊस पडायला लागतो. या बदलत्या हवामानामुळे आरोग्यावर दुष्परिणाम होत आहेत.

गेल्या आठ दिवसांपासून वातावरणात झालेल्या बदलामुळे अंगदुखी, अनुत्साही वाटणं, डोके दुखणे अशा आजांरात वाढ झाली आहे. अचानक वाढलेला गारवा आरोग्याला बाधक ठरत आहे. घरातील मोठ्यापासून ते लहानांपर्यंत सर्दी, खोकल्याचे रूग्ण दिसत आहेत. मे महिन्यामध्ये 40 अंश असणारे कमाल तापमान आता 32 अंशावर आले आहे. तर, किमान तापमान 22 अंश आहे. वातावरणात 10 अंशाचा फरक पडला आहे.

ठिकठिकाणी खड्ड्यात साचलेले पाणी

सध्या पावसामुळे शहरात ठिकठिकाणी खड्डे, डबकी साचले आहेत. त्यातच कचरा पडत आहे. पाणी वाहून जाण्याची प्रक्रिया थांबल्यामुळे त्याचा परिणाम गेल्या काही दिवसांपासून जाणवत आहे. त्यामुळेच संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढत आहे. परिणामी किटकांमुळे उद्भवणारे आजार वाढत आहेत. यामुळे नागरिकांमध्येचही भीतीचे वातावरण आहे. या आजाराकडे दुर्लक्ष केले, तर तो प्राणघातक ठरू शकतो. या आजारावर वेळीच उपचार करण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

माशा, डास, चिलटांमध्ये वाढ

सध्या आंबा, फणस, जांभूळ यांचा सिजन आहे. मात्र, फळांचा कचरा, साली आणि खराब झालेली फळांमुळे माशा आणि चिलटांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वातावरणात किटकांचे प्रमाण वाढत आहे. हेच माशा आणि चिलटे घरातील अन्नावर, हॉटेलमधील, हातगाड्यांवरील पदार्थांवर बसून आजार पसवतात.

कोरोनाची चाचणी नाही

सध्या कोरोनाचे रुग्ण सापडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र, सर्दी, खोकला, ताप असणार्‍या रुग्णांची सरसकट कोरोनाची चाचणी केली जात नाही. खासगीमध्ये चाचणीसाठी 500 रुपये आकारले जातात. मनपा किंवा शासकीय रुग्णालयामध्ये चाचणी केली जात नाही. फक्त इन्फ्लुएन्झासदृश आणि व्हेंटिलेटरवर असणारे रुग्णांचीच कोरोना चाचणी केली जाते.

काय घ्याल काळजी..

  • सर्दी, खोकला व तापासारख्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका

  • घरातील लहान मुलांचे लसीकरण करा

  • घराभोवती पाण्याचे

  • डबके साचणार नाही

  • याची काळजी घ्या

  • सांडपाण्याचा व्यवस्थित निचरा करा

  • पावसाळ्यातील पथ्य

  • पाणी गाळून, उकळून प्यावे

  • उघड्यावरील पदार्थ

  • खाण्याचे टाळा

  • मांसाहार, मसालेदार पदार्थ, वातजन्य पदार्थांचे सेवन टाळा

  • डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्या..

वातावरण बदलल्यामुळे सर्दी, ताप, खोकला यांच्या रुग्णाची संख्या वाढत आहे. काही डेंग्यूचेदेखील रुग्ण आहेत. सध्याचे वातावरण विषाणूजन्य आजारांना पोषक आहे. अंगदुखी, ताप, सर्दी, खोकल्याच्या रुग्णांनी त्वरित डॉक्टरांशी संपर्क करावा.
- डॉ. किशोर खिलारे, अध्यक्ष, जनसेवा आरोग्य मंच

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT