पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागांमध्ये नियमबाह्य पद्धतीने उभारण्यात आलेल्या गतीरोधकांमुळे वाहनचालकांसह नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पिंपरी, चिंचवड, रावेत, निगडी, दापोडी, मोशी, डुडूळगाव, वाल्हेकरवाडी आदी परिसरांतील अनेक रस्त्यांवर वाहतूक विभागाच्या निकषांचे पालन न करता गतीरोधक बसविण्यात आल्याची बाब समोर आली आहे.
अपघाताची भीती
वाहतुकीचा वेग नियंत्रित करण्याच्या उद्देशाने गतिरोधक उभारले जात असले, तरी अनेक ठिकाणी त्यांची उंची, रुंदी आणि रचना निर्धारित मानकांनुसार नसल्याचे दिसून येते. काही गतीरोधकांवर आवश्यक रंगरंगोटी, दिशादर्शक फलक किंवा परावर्तित पट्ट्यांची व्यवस्था नसल्याने विशेषतः रात्रीच्यावेळी वाहनचालकांना ते अचानक दिसतात. त्यामुळे दुचाकीस्वारांचे संतुलन बिघडून अपघात होण्याच्या घटना घडत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
नियमबाह्य गतिरोधक काढण्याची मागणी
नियमबाह्य गतिरोधक टाळण्यासाठी अनेक वाहनचालक अचानक वळणे घेणे, विरुद्ध दिशेने वाहन चालविणे किंवा बाजूच्या मार्गांचा वापर करणे अशा धोकादायक हालचाली करत असल्याचे चित्र आहे. परिणामी वाहतूककोंडीबरोबरच अपघातांचा धोका वाढत आहे. स्थानिक नागरिकांनी आणि वाहनचालकांनी महापालिका व वाहतूक पोलिस प्रशासनाने शहरातील सर्व गतीरोधकांचे सर्वेक्षण करून नियमबाह्य गतीरोधक तातडीने हटवावेत किंवा मानकांनुसार दुरुस्त करावेत, अशी मागणी केली आहे. दरम्यान, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी संबंधित विभागाने आवश्यक उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.