Pimpri Latest News: विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता मंगळवार (दि.15) पासून लागू झाली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील राजकीय पक्ष व नेत्यांचे जाहिरात होर्डिंग, फ्लेक्स काढण्यास सुरुवात झाली आहे. तसेच, लोकप्रतिनिधींचे नामफलक झाकण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीची घोषणा भारत निवडणूक आयोगाने आज दुपारी केली. त्यामुळे तेव्हापासूनच राज्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहितेची सर्व प्रशासकीय यंत्रणांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
त्यामुळे शहरातील राजकीय पक्षांचे नामफलक, झेंडे, राजकीय नेत्यांचे होर्डिंग व फ्लेक्स काढण्यात येत आहेत. भिंतीवरील राजकीय जाहिरात बुजविण्यात येत आहे. पोस्टरही काढून घेण्यात येत आहेत. माजी नगरसेवक, लोकप्रतिनिधींचे नामफलक तसेच, जनसंपर्क कार्यालयाचे नामफलक झाकण्यास येत आहेत. शहरभरात नवरात्र, वाढदिवस, महापुरूष तसेच, अभिवादनाचे फ्लेक्सची गर्दी झाली होती.
अनेक इच्छुकांनी होर्डिंग व फ्लेक्स लावले होते. होर्डिंग काढून घेण्यात येत असून, फ्लेक्स जप्त करण्यात आले आहेत. महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभाग तसेच, सर्व आठ क्षेत्रीय कार्यालयांकडून ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. राजकीय पक्षाचे तसेच, नेत्यांच्या होर्डिंग व फ्लेक्स असल्यास ते तात्काळ काढून घ्यावेत. अन्यता कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिकेने दिला आहे.
राजकीय होर्डिंग, फ्लेक्स तात्काळ हटवा
राज्यात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला आहे. निवडणूक आयोगामार्फत आदर्श आचारसंहितेची मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आले आहे. त्यामधील सूचनांचे पालन करून आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची प्रत्येकाने दक्षता घ्यावी.
पिंपरी-चिंचवड शहरात नियमबाह्य तसेच, अनधिकृतपणे लावण्यात आलेले राजकीय फ्लेक्स, बॅनर, होर्डिंग्स, चिन्ह, ध्वज, फलक, भिंतीवरील राजकीय जाहिराती तात्काळ हटविण्यात याव्यात, असे आदेश महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी संबंधित विभागांना दिले आहेत.
विधानसभा व मतदारसंख्या
पिंपरी : 3 लाख 77 हजार 251
चिंचवड : 6 लाख 27 हजार 437
भोसरी : 5 लाख 58 हजार 959
एकूण- 15 लाख 63 हजार 647