पिंपरी: हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनासाठी पुन्हा प्रतीक्षा करावी लागणार आहे. माण ते बालेवाडी या पहिल्या टप्प्यावर १५ जुलैपासून मेट्रोसेवा सुरू करण्याचे नियोजन ‘पीएमआरडीए’कडून करण्यात आले होते. मात्र, मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून (सीएमआरएस) अंतिम सुरक्षा प्रमाणपत्र अद्याप प्राप्त झाले नसल्याने हा मुहूर्तही हुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीने हैराण झालेल्या हिंजवडी परिसरातील सुमारे १० लाख आयटी कर्मचारी आणि नागरिकांच्या तोंडाला पाने पुसली आहेत.
सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय सेवा अशक्य
माण ते बालेवाडीदरम्यानच्या १२ स्थानकांची सुरक्षा तपासणी नुकतीच सीएमआरएसकडून पूर्ण करण्यात आली आहे. मात्र, तपासणीनंतरचा अंतिम अहवाल आणि व्यावसायिक प्रवासी वाहतुकीसाठी आवश्यक असलेले सुरक्षा प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय मेट्रोसेवा सुरू करता येणार नाही. त्यामुळे सर्व तांत्रिक कामे पूर्ण झाली असली, तरी प्रवाशांसाठी मेट्रो सुरू करण्यास अद्याप हिरवा कंदील मिळालेला नाही.
अहवालानंतरही किमान १५ दिवसांची प्रतीक्षा
पीएमआरडीएच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीएमआरएसचा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतरही विविध तांत्रिक, प्रशासकीय आणि कार्यान्वयनाशी संबंधित प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किमान दोन आठवड्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे जुलैमध्ये मेट्रो सुरू होण्याची शक्यता कमी असून, ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात सेवा सुरू होणार आहे.
मुख्यमंत्री आणि आयुक्तांच्या तंबीनंतरही विलंब
पीएमआरडीएचे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी विकसक कंपनी 'पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड'ला वारंवार वेळेत काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तरीही सेवा सुरू होण्यात सातत्याने होणारा विलंब हा प्रकल्पातील समन्वयाच्या अभावावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरत आहे. प्रशासनाच्या स्पष्ट निर्देशांनंतरही आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.
पाचव्यांदा अंतिम मुदतीत बदल
२३ किलोमीटर लांबीच्या या महत्त्वाकांक्षी मेट्रो मार्गासाठी आतापर्यंत तब्बल पाच वेळा अंतिम मुदत बदलण्यात आली आहे. सुरुवातीला संपूर्ण मार्ग एकाच टप्प्यात सुरू करण्याचा मानस होता. मात्र, कामाचा वेग अपेक्षेपेक्षा मंद असल्याने राज्य सरकारने मार्चमध्ये धोरणात बदल करून टप्प्याटप्प्याने सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, माण ते बालेवाडी हा पहिला टप्पा सुरू करण्यावर भर देण्यात आला; मात्र त्यालाही आता विलंब होत आहे.
मुख्यमंत्र्यांच्या आदेशांनाही विलंबाचे ग्रहण
माण ते बालेवाडी टप्पा १५ जुलैपर्यंत सुरू करण्याचे निर्देश स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्यापूर्वी मे आणि जून या मुदतही निश्चित करण्यात आल्या होत्या. मात्र, तांत्रिक मंजुरी आणि सुरक्षा प्रमाणपत्राच्या प्रक्रियेमुळे प्रत्येक वेळी उद्घाटन पुढे ढकलावे लागले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या आदेशांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात विकसक कंपनी अपयशी ठरल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात सुरू आहे.
वाहतूक कोंडीने त्रस्त आयटीयन्समध्ये संताप
हिंजवडी आयटी पार्क परिसरातील तीव्र वाहतूककोंडी, वाढता प्रवासाचा वेळ आणि दैनंदिन गैरसोयींमुळे हजारो आयटी कर्मचारी आधीच त्रस्त आहेत. मेट्रोसेवा सुरू झाल्यास या समस्यांवर मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, वारंवार बदलणार्या उद्घाटनाच्या तारखा आणि सातत्याने होणारा विलंब यामुळे आयटीयन्समध्ये संताप वाढत असून, आता सुरक्षा प्रमाणपत्र नेमके कधी मिळणार आणि उद्घाटनाची पुढील तारीख काय असणार, याकडे संपूर्ण पुणेकरांचे लक्ष लागले आहे.
सीएमआरएसचा रिपोर्ट येण्यास विलंब होत आहे. अजून पाहणी सुरू असून रिपोर्ट मिळाल्यानंतर पंधरा ते वीस दिवसांनी शहरवासीयांसाठी मेट्रोची सेवा सुरु होईल.रिनाज पठाण, मुख्य अभियंता, पीएमआरडीए.