जयदीप सूर्यवंशी
रावेत: हिंजवडी आयटी पार्क परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या गेल्या अनेक वर्षांपासून आयटी कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत होती. सकाळी कार्यालयात जाताना आणि सायंकाळी घरी परतताना प्रमुख रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत होत्या. काही किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठीही मोठा वेळ खर्च करावा लागत होता. मात्र, हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो सेवा सुरू झाल्यानंतर या परिस्थितीत सकारात्मक बदल दिसून येत आहे. मेट्रोमुळे रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होत असून, आयटी कर्मचाऱ्यांकडून या सेवेचे स्वागत केले जात आहे.
हिंजवडी परिसरात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांची संख्या मोठी असून, दररोज हजारो कर्मचारी कामानिमित्त ये-जा करतात. त्यामुळे सकाळी आणि सायंकाळी प्रमुख चौक, रस्ते तसेच आयटी पार्क परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असे. या कोंडीमुळे कर्मचाऱ्यांचा प्रवासाचा वेळ वाढत होता. परिणामी त्यांच्या कामाच्या वेळापत्रकावर तसेच वैयक्तिक आयुष्यावरही परिणाम होत होता.
खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध व्हावी, अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती. मेट्रो सेवा सुरू झाल्याने या परिसरातील प्रवाशांना जलद आणि सोयीस्कर प्रवासाचा पर्याय उपलब्ध झाला आहे. विशेषतः कार्यालयीन वेळेत मेट्रोचा वापर करणाऱ्या कर्मचाऱ्यांना रस्त्यावरील वाहतूक कोंडीत अडकण्यापासून दिलासा मिळत आहे. प्रवासाचे नियोजन करणे सोपे झाले असून, खासगी वाहनांचा वापर कमी होण्यासही मदत होत आहे.
आठ दिवसांत अडीच लाख प्रवाशांनी केला प्रवास
मेट्रो सेवेला प्रवाशांकडून मिळणारा प्रतिसादही आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडच्या माहितीनुसार, ४ ते ११ नोव्हेंबर या आठ दिवसांच्या कालावधीत तब्बल २ लाख ६६ हजार ५५८ प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला आहे. सुरुवातीच्या दिवसांपासून प्रवाशांची लक्षणीय संख्या दिसून येत असून, सार्वजनिक वाहतुकीकडे नागरिकांचा कल वाढत असल्याचे चित्र आहे.
वाहनचालकांची कोंडीतून सुटका
मेट्रोमुळे केवळ प्रवासाचा वेळ वाचत नसून, रोजच्या वाहतूक कोंडीमुळे निर्माण होणारा मानसिक ताणही कमी होत आहे. वेळेवर कार्यालयात पोहोचणे आणि कामानंतर घरी परतण्यासाठी अधिक वेळ उपलब्ध होणे, यामुळे नोकरदार वर्गाला दिलासा मिळत आहे. आगामी काळात मेट्रो प्रवाशांची संख्या वाढल्यास रस्त्यांवरील खासगी वाहनांचा भार आणखी कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हिंजवडी मेट्रो सेवा सुरू झाल्यामुळे परिसरातील वाहतूक कोंडीत लक्षणीय घट झाली आहे. मेट्रोमुळे प्रवाशांचा सार्वजनिक वाहतुकीकडे कल वाढत असून, रस्त्यांवरील खासगी वाहनांची संख्या कमी होण्यास मदत होत आहे. याचा सकारात्मक परिणाम वाहतुकीच्या प्रवाहावर दिसून येत आहे. यापूर्वी सायंकाळी सुमारे ८.३० वाजेपर्यंत वाहतुकीची वर्दळ आणि कोंडी कायम असायची. मात्र, आता हा वाहतुकीचा ताण साधारणपणे ७.३० वाजेपर्यंतच जाणवत आहे. मेट्रो सेवेमुळे नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ होत असून, वाहतूक व्यवस्थेवरील ताणही कमी झाला आहे.राहुल सोनवणे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, हिंजवडी वाहतूक विभाग.
मी बाणेर येथे राहतो आणि दररोज कामानिमित्त हिंजवडीला ये-जा करतो. यापूर्वी सकाळी आणि सायंकाळी वाहतूक कोंडीमुळे प्रवासात बराच वेळ जायचा. अनेकदा घरी पोहोचण्यासही उशीर होत असे. मात्र, मेट्रोचा पर्याय उपलब्ध झाल्यामुळे प्रवास अधिक सोयीचा झाला आहे. वेळेची बचत होत असून, वाहतूक कोंडीचा मानसिक ताणही कमी झाला आहे. मेट्रोमुळे आयटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, भविष्यात अधिकाधिक लोकांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा.आयुष काबरा, आयटी कर्मचारी, बाणेर.