पंकज खोले
पिंपरी : पुणे, पिंपरी-चिंचवड या स्मार्टसिटीच्या लगत असलेला हिंजवडी आयटी परिसरात पायाभूत सुविधांच्या अभावी पुरता बोजवारा उडाला आहे. स्थानिक ग्रामपंचायतीचे अधिकारी, शासकीय विभागांत समन्वयाचा अभाव, एमआयडीसीचे दुर्लक्ष आणि राजकीय अनास्था यामुळे हिंजवडी समस्येच्या गर्तेत अडकले आहे. त्यातच अनियंत्रित विकास, नियमांना फाटा देत उभी राहणारी बांधकामे आणि बेशिस्त वाहतुकीमुळे आयटी हबची ओळख ट्रॅफिक जाम अशी होवू लागली आहे. (Latest Pune News)
हिंजवडी आयटी पार्क नगरी म्हणून या लगतचा भाग देखील मोठया प्रमाणात विकसित होवू लागला आहे. त्यात मारुंजी, नेरे, माण, पांडवनगर, भूमकरवस्ती, विनोदेवस्ती, भटेवरानगर यासारख्या जागेवर इमारती, व्यावसायिक गाळे आणि हॉटेल्स उभी राहिली आहेत. एवढेच नव्हे, तर आता परदेशातील अन्न पदार्थ विक्री करणारी दुकाने, बॅण्ड्रेड कंपडयांचे शोरुम येवू घातले आहे. मात्र, पायाभूत सुविधांचा अभाव यामुळे या परिसरातील परिस्थती आणखीनच बिकट होवू लागली आहे.
रस्त्याच्या कडेला असलेल्या जागांवर अतिक्रमण झाल्यामुळे हिंजवडी आयटी पार्कमध्ये कोंडीसह अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. रस्त्यांवरील अनधिकृत दुकाने आणि किऑस्कमुळे प्रमुख चौकांमध्ये वाहतूक कोंडी होते. याविषयी अनेक तक्रारी असूनही, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए), महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी), सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक ग्रामपंचायतीचे उपाययोजना आणि रस्त्याच्या डागडुजीचा प्रश्न कागदावरच आहे.
चौकांचा श्वास गुदमरला : हिंजवडी फेज 1 ते फेज 3 रोड, हिंजवडी ते छत्रपती शिवाजी महाराज चौक रोड आणि लक्ष्मी रोड ते हिंजवडी रोड यासारख्या प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून, ते काढण्यात आल्याचे एमआयडीसी विभाग सांगत आहे. प्रत्यक्षात अद्यापही या पाच चौकांतील अतिक्रमणाची स्थिती तशीच आहे.
रस्त्याची बिकट स्थिती : हिंजवडी आयटी पार्ककडे जाणार्या रस्त्यांची अद्याप डागडुजी झालेली नाही. कस्तुरी चौक, मधुबन चौक रस्ता, एमआयडीसी कार्यालाय, मेझा 9 चौक, विनोदे वस्ती, लक्ष्मी चौक, हिंजवडी आयटी पार्क फेज 2, विप्रो सर्कल या प्रमुख चौकातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणी तात्पुरते खडी टाकून मलमपट्टी केली आहे; मात्र पावसामुळे परिस्थिती जैसे- थे आहे. त्यातच पुणे बंगळूर मार्गावरील सेवा रस्त्याचीही मोठी हलाखीची अवस्था झाली आहे.