Heavy rain in Pimpri causes trouble for citizens
पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात शनिवारी (दि. 13) दुपारी अचानक आलेल्या जोरदार पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली.पावसाने गेल्या आठवड्यामध्ये उघडीप दिली होती. गेल्या आठवडाभर दिवसा आणि रात्रीही उकाडा जाणवत होता.
पावसाळा संपत आल्याने नागरिकांजवळ छत्री आणि रेनकोट नसल्याने शनिवारी आलेल्या पावसाने मोठी फजिती झाली. जोरदार पाऊस आल्याने खरेदीसाठी आलेले नागरिक दुकाने, शोरुम्स, मॉल, हॉटेल याठिकाणी अडकून पडले. (Latest Pimpri News)
सुमारे तासभर पडलेल्या पावसाने रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले. अचानक आलेल्या पावसामुळे दुचाकीस्वार व पादचारी नागरिकांना भिजतच घर गाठावे लागले. पथारीवाले, भाजी विक्रेत्यांची सामानाची आवराआवर करताना पळापळ झाली.
दुभाजकातील माती रस्त्यावर
खराळवाडी येथे मेट्रो दुभाजकात टाकण्यात आलेली लाल माती पावसामुळे रस्त्यावर वाहून आली होती. त्यामुळे रस्त्यावर चिखल झाला. त्यामुळे आठ-दहा दुचाकी घसरून अपघात झाले. यामध्ये काहीजण किरकोळ जखमी झाले आहेत. दुपारी पावणे दोनच्या सुमारास परिस्थिती गंभीर झाल्याने पोलिसांनी अग्निशामक दलाला कळवले.
तातडीने दोन बंब घटनास्थळी दाखल होऊन रस्त्यावरचा चिखल पाण्याच्या फवाऱ्याने हटविण्यात आला. या प्रकारामुळे नागरिकांनी संबंधित विभागावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. दुभाजकात माती टाकताना योग्य काळजी घेण्यात आली नसल्याने अपघाताचा धोका वाढला, अशी नाराजी नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली. यापुढे अशा घटना घडू नयेत म्हणून प्रशासनाने खबरदारी घेण्याची मागणी यानिमित्ताने होत आहे.